संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पाच महिने आधी डेमोक्रॅट उमेदवार आणि अध्यक्ष जो बायडेन आणि प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अध्यक्षपदाची पहिली चर्चा झाली. चार वर्षांनंतर उभय उमेदवारांत दुसऱ्यांदा ही चर्चा झाली. जागतिक हवामान संकटाचा सामना करण्यासाठी काय कराल, या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी भारत-चीन पैसे देत नाहीत, आम्हाला पैसे द्यावे लागले, असे उत्तर दिले.
यापूर्वी २०२० च्या निवडणुकीत दोघेही आमनेसामने आले होते. जॉर्जियातील अटलांटामधील सीएनएनच्या स्टुडिओमध्ये झालेल्या ७५ मिनिटांच्या चर्चेत दोन्ही नेत्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते मांडली. ट्रम्प हे चर्चेमध्ये बायडेन यांच्यापेक्षा जास्त वेळ बोलले. या चर्चेसाठी ट्रम्प, बायडेन सीएनएन स्टुडिओत पोहोचले तेव्हा दोन्ही नेत्यांनी परस्परांशी हस्तांदोलनही केले नाही. बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे पाहिले आणि हात हलवला. त्यांना विचारले की ते कसे आहेत. ट्रम्प शांतपणे त्यांच्या जागेवर जाऊन उभे राहिले.
पहिली अध्यक्षीय चर्चा ही सहसा सप्टेंबरमध्ये होते. प्रथमच, ही चर्चा वेळेआधी तीन महिने झाली. विशेष म्हणजे अध्यक्षीय निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी अद्याप उमेदवारही घोषित केलेले नाहीत. या चर्चेचे संयोजन सीएनएनचे सूत्रसंचालक जेक टॅपर, डाना बॅश यांनी केले होते. महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी उमेदवारांना एक-एक प्रश्न विचारले. ट्रम्प-बायडेन यांच्याकडे उत्तर देण्यासाठी २ मिनिटे होती.
लढतीतील वृद्ध उमेदवार
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या इतिहासात प्रथमच एवढे वृद्ध उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बायडेन ८१ वर्षांचे तर ट्रम्प ७८ वर्षांचे आहेत. यापूर्वी वयोवृद्ध उमेदवाराचा विक्रम रोनाल्ड रेगन यांच्या नावावर होता. १९८४ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा ते ७३ वर्षांचे होते. मात्र, त्यांचा हा विक्रम गेल्या निवडणुकीतच मोडला गेला. या चर्चेतील काही प्रश्न आणि संपादित उत्तरे अशी.
प्रश्न- ट्रम्प निवडणूक निकाल स्वीकारतील का?
ट्रम्प यांनी दोनदा प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. हा प्रश्न तिसऱ्यांदा विचारला असता ट्रम्प म्हणाले, निवडणूक निष्पक्ष, कायदेशीर मार्गाने पार पडली तर नक्की स्वीकारू.
ट्रम्प म्हणाले की, बायडेन यांनी देशाची स्थिती अत्यंत वाईट केली आहे. त्यामुळेच ते पुन्हा निवडणूक लढवत आहेत.
बायडेन म्हणाले, तुम्ही भांडखोर आहात. गेल्या वेळी तुम्ही देशभरातील न्यायालयात दाद मागितली होती. तुमच्या दाव्यात योग्यता आढळली नाही. फसवणुकीचा एकही पुरावा कोणालाही सापडला नाही. तुम्ही पुन्हा हरलात तर तुम्ही निकाल स्वीकाराल असे मला वाटत नाही.
मुद्दा- जास्त वय
ट्रम्प म्हणाले- मी ३ चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत.
प्रश्न- तुम्ही निवडून आल्यास, तुमचा कार्यकाळ संपेपर्यंत तुमचे वय ८६ वर्षांचे होईल. तुमच्या वयाशी संबंधित चिंतांबद्दल काय?
बायडेन- माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला माझ्यावर तरुण असल्याची टीका झाली. आता म्हातारपणामुळे लोक तक्रार करतात. ट्रम्प माझ्यापेक्षा फक्त ३ वर्षांनी लहान आहेत. तुम्ही माझे कर्तृत्व पाहावे.
प्रश्न- तुम्ही निवडून आल्यास, कार्यकाळ संपेपर्यंत तुमचे वय ८२ वर्षांचे होईल. तुमच्या वयाबद्दलही प्रश्न आहेच.
ट्रम्प- मी वयाशी संबंधित दोन चाचण्या केल्या आहेत. बायडेनची एकही चाचणी झाली नाही. मी दरवर्षी शारीरिक चाचणी देतो. मी दोन गोल्फ चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. हे करण्यासाठी तुम्ही हुशार असले पाहिजे. बॉलला दूरवर मारण्याची ताकदही तुमच्यात असायला हवी. बायडेन यांना ५० यार्ड्सवर चेंडू मारता येत नाही.
यावर बायडेन यांनी खिल्ली उडवली की, ते त्यांच्यासोबत ड्रायव्हिंग टेस्टमध्ये हात आजमावू शकतात. यावर ट्रम्प यांनी बायडेन यांना मुलांसारखे वागू नका असे सांगितले.
मुद्दा- जागतिक हवामानाच्या संकटाचा सामना करण्यासाठी तुम्ही काय कराल?
ट्रम्प- भारत-चीनसारखे देश पैसे देत नाहीत, आम्हाला पैसे द्यावे लागले.
प्रश्न- तुमच्या दोघांच्या कार्यकाळात अमली पदार्थांच्या अतिवापराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेला अमली पदार्थांच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी, उपचारांसाठी तुम्ही काय कराल?
ट्रम्प - बायडेन यांच्या कार्यकाळात आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. यासाठी बायडेनला चीनकडून पैसे मिळतात. ते मंचुरियन उमेदवार आहेत. त्यांना चीनशी व्यवहार करण्याची भीती वाटते. चीन आपल्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनापूर्वी आम्ही औषधांच्या समस्येचा सामना करत होतो. त्यानंतर सीमेपलीकडून ड्रग्जचा पुरवठा होऊ लागला. तो रोखण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलली. त्यामुळे तस्करीत घट झाली. नंतर बायडेन यांच्या कार्यकाळात अमली पदार्थांचा पुरवठा वाढला.
बायडेन- ट्रम्प यांचे आरोप खोटे आहेत. देशात फेंटॅनाइलच्या तस्करीत घट झाली आहे. आम्ही सीमेवर ड्रग्ज शोधणारी यंत्रे बसवत आहोत. ट्रम्प यांनी त्यांच्या रिपब्लिकन खासदारांना बोलावून या यंत्रणेला परवानगी देऊ नये असे सांगितले होते.