भारताचा स्वातंत्र्यदिन अमेरिकेत राष्ट्रीय उत्सव?
#वॉशिंग्टन
अमेरिकेतही भारताचा स्वातंत्र्यदिन लवकरच राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जाऊ शकतो. याबाबतचा प्रस्ताव देशाच्या संसदेत मांडण्यात आला आहे. भारतीय वंशाचे खासदार श्री. ठाणेदार यांनी हा ठराव अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात मांडला आहे.
यामध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन हा जगातील २ सर्वांत मोठ्या लोकशाही देशांचा राष्ट्रीय उत्सव म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या विधेयकाचा आधार भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत भागीदारी असल्याचे सांगण्यात आले आहे, जी दोघांच्या लोकशाही मूल्यांवर अवलंबून आहे. ही भागीदारी इतर देशांमध्येही जागतिक लोकशाही, शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी मदत करेल. ठरावाला काँग्रेसचे सदस्य बडी कार्टर आणि ब्रॅड शर्मन यांनीही सहप्रायोजित केले आहे.
प्रस्तावात म्हटले आहे की, 'पीएम मोदी २२ जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, त्यांनी दोन्ही देशांचे समान हित, स्वातंत्र्य, लोकशाही, कायद्याचे राज्य, मानवी हक्कांचा आदर यावर आधारित विश्वास आणि परस्पर सामंजस्य वाढवले आहे.'
अमेरिकेत राहणारे भारतीय वेगवेगळ्या पदांवर काम करत असल्याचे प्रस्तावात सांगण्यात आले आहे. यामध्ये सरकारी अधिकारी, शिपाई, कायदेशीर अधिकारी अशा अनेकांचा समावेश आहे. हे सर्व मिळून अमेरिकेचे जीवन चांगले बनविण्यात आणि येथील तत्त्वे जगासमोर नेण्यास मदत करत आहेत. हे पाहता भारताचा स्वातंत्र्यदिन अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसोबत साजरा करणे आवश्यक आहे. हे दोन्ही देश ज्या लोकशाही तत्त्वांच्या आधारावर जन्माला आले ते अधिक दृढपणे लागू करू शकतील.
वृत्तसंंस्था