‘इलेक्शन मोड’मध्ये राहण्याचे इम्रानचे आवाहन
#इस्लामाबाद
वर्षाच्या शेवटी होणाऱ्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीस सज्ज राहण्याचे आवाहन पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. पंजाब सरकारने मोठ्या प्रमाणावर पोलीस दल तैनात करूनही शनिवारी लाहोर येथील मिनार- ए-पाकिस्तान येथे झालेली रॅली यशस्वी झाल्याबद्दल इम्रान खान यांनी लाहोरच्या नागरिकांचे आभार मानले आहेत. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निषेध मोर्चावेळी पोलिसांनी पायावर केलेल्या गोळीबारामुळे अजूनही चालण्यात अडचण जाणवत असल्याचेही त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
लाहोरमध्ये त्यांनी बुलेटप्रूफ काचेआडून केलेल्या भाषणातून पाकिस्तानची अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत कशी करता येईल याचा आराखडा सादर केला होता. त्याचबरोबर शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लीम लिगच्या (नवाज गट) सरकारला धारेवर धरले होते. सरकारविरुद्ध काढलेल्या निषेध मोर्चानंतर चार महिन्यांनी त्यांनी ही रॅली घेतली होती. त्यावेळी काढलेल्या मोर्चावेळी इम्रान खान हे गोळीबारात जखमी झाले होते.
नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या गोळीबाराबाबत ते म्हणाले की, आपल्या उजव्या पायाला लागलेल्या गोळीबारामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे दीर्घकालीन परिणाम जाणवत असून त्यावेळी आपणाला चार गोळ्या लागल्या होत्या. वझिराबादमध्ये एका कंटेनरवरील ट्रकमधून निषेध मोर्चाचे नेतृत्व करत होतो त्यावेळी आपल्या दिशेने चार गोळ्या झाडल्या गेल्या. गोळ्यांमुळे झालेल्या जखमांपेक्षा अजूनही मला नसांचे झालेले नुकसान जाणवत असते. तेथील संवेदना पूर्णपणे परत आलेल्या नाहीत. हा परिणाम आणखी काही काळ जाणवत असणार असे सांगण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे नुकसान काळाप्रमाणे भरून येणार आहे. मात्र, अजूनही मी योग्य पद्धतीने चालू शकत नाही.
शनिवारची रॅली ऐतिहासिक होती असे सांगून ७० वर्षांचे इम्रानखान म्हणाले की, जेथे रॅली झाली ती जागा ऐतिहासिक होती आणि ती सर्वांत मोठी जागा होती. त्यामुळे ती जागा लोकांच्या गर्दीने भरणे ही सहज सोपी बाब नाही. तेथे होणारी तुमची रॅली सारा देश बघत असतो. ती जागा जेव्हा भरते तेव्हा तुम्हाला असलेला जनतेचा पाठिंबा किती विशाल आहे, हेच त्यातून दिसून येते. वृत्तसंस्था