संग्रहित छायाचित्र
इस्लामाबाद : देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानच्या तेहरीक ए इन्साफ ( पीटीआय ) या पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अताउल्ला तरार यांनी ही घोषणा केली.
अताउल्ला तरार म्हणाले, ९ मे रोजी झालेल्या घटनांमध्ये या पक्षाचा सहभाग आणि पक्षनेत्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबरचा करार मोडीत काढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पीटीआयवर बंदी घालण्यासाठी आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. सर्वात मोठ्या विरोधी पक्षावर बंदी घालण्याचा मुद्दा गरज पडल्यास शक्यतो सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला जाईल.
‘पीटीआय’ काय आहे?
पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ हा देशातील एक राजकीय पक्ष असून याची स्थापना १९९६ मध्ये इम्रान खान यांनी केली होती. त्यांनी २०१८-२०२२ पर्यंत पंतप्रधान म्हणूनही काम केले. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ, पाकिस्तान पीपल्स पार्टी या प्रमुख राजकीय पक्षांनंतर पीटीआयचा नंबर लागतो. २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून नॅशनल असेंब्लीमध्ये प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने सर्वांत हा मोठा पक्ष आहे. एप्रिल २०२२ मध्ये विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांचे सरकार पडलं. पाकिस्तान सरकारने गेल्या आठवड्यात दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल होऊ शकते.
इम्रान खान सध्या तुरुंगात
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. पाकिस्तानातील एका न्यायालयाने रविवारी इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या नव्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आठ दिवसांच्या कोठडीसाठी भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. जिल्हा न्यायालयाने शनिवारी या दोघांचीही विवाह प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. मात्र, लगेच एनएबीने त्यांना अटक केली.
अविश्वास प्रस्तावाद्वारे पदावरून हटवलेले पहिले पंतप्रधान बनल्यानंतर खान यांना देशात अनेक खटल्यांना सामोरे जावे लागले होते. खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर १९० दशलक्ष पौंडच्या भ्रष्टाचार प्रकरणात रिअल इस्टेट टायकूनकडून कोट्यवधींची जमीन लाच स्वरूपात घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या खान यांनी काही आठवड्यांपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयात या कारवाईलाच आव्हान दिले होते.