इम्रान खान यांना अटक
#इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली. त्यांना पाकिस्तानी रेंजर्स म्हणजेच निमलष्करी दलाने अटक केली. इम्रान खान त्यांच्यावर सुरू असलेल्या दोन खटल्यांमध्ये जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात गेले असताना ही घटना घडली.
एका प्रत्यक्षदर्शीने पाकिस्तानच्या माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान उच्च न्यायालयात दाखल होताच निमलष्करी दल आणि सशस्त्र दलाची पथकेही उच्च न्यायालयात दाखल झाली. प्रवेशद्वार चिलखती वाहनांनी अडवण्यात आले आणि काही वेळातच इम्रान यांना पकडून बाहेर आणण्यात आले.
अलीकडेच इम्रान खान यांनी गुप्तहेर खात्याच्या उच्च अधिकार्यांवर आरोप केला होता की, त्यांनी वजिराबादमध्ये आपल्याला ठार मारण्याचा कट रचला होता. पाकिस्तानी लष्कराने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर इम्रान यांनी एक व्हीडीओ प्रसिद्ध करून आरोपांची पुनरावृत्ती केली. याच्या चार तासांनंतर त्यांना न्यायालयातून अटक करण्यात आली.
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारुक यांनी गृह मंत्रालयाचे सचिव आणि इस्लामाबादचे पोलीसप्रमुख यांनाही अटक केल्यानंतर १५ मिनिटांत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती फारुक म्हणाले की, पोलीसप्रमुख न्यायालयात हजर झाले नाही, तर आम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना येथे बोलावू. या लोकांनी कोर्टात येऊन सांगावे की, इम्रान यांना कोणत्या प्रकरणात आणि का अटक करण्यात आली आहे?
अल कादिर ट्रस्ट प्रकरणात कारवाई
इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हे विद्यापीठाशी संबंधित प्रकरण आहे. इम्रान यांनी पंतप्रधान असताना या विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांची जमीन बेकायदा दिली होती. या प्रकरणाचा खुलासा पाकिस्तानातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मलिक रियाझ यांनी केला आहे.
अटकेचा धाक दाखवून इम्रान आणि त्यांच्या पत्नीने कोट्यवधी रुपयांची जमीन आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर रियाझ आणि त्याच्या मुलीच्या संभाषणाचा एक ऑडिओ लीक झाला होता. यामध्ये रियाझ यांच्या मुलीचे म्हणणे आहे की, इम्रान यांची पत्नी बुशरा बीबी त्यांच्याकडे सतत पाच कॅरेटची हिऱ्याची अंगठी मागत आहे. यावर रियाझ म्हणतात की, तिने जर सर्व काही केले, तर तिला पाच कॅरेटची अंगठी द्या.'
विशेष बाब म्हणजे, अल कादिर विद्यापीठात केवळ दोन विश्वस्त आहेत. इम्रान आणि त्यांची पत्नी बुशरा. सुमारे ९० कोटींच्या या विद्यापीठात ६ वर्षांत केवळ ३२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. खान यांच्यावर एकूण १०८ गुन्हे दाखल आहेत. यापैकी ४ असे आहेत, ज्यात त्यांची अटक निश्चित आहे. यामुळेच खान यापैकी कोणत्याही प्रकरणात न्यायालयात हजर राहात नाहीत. लष्कराशी वैर पडले महागात
इम्रान खान यांना लष्करानेच २०१८ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान केले होते. नंतर आयएसआयप्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्या बदलीवरून तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर लष्कराने शाहबाज शरीफ यांची बाजू घेत गेल्या वर्षी एप्रिलमध्ये इम्रान यांचे सरकार पाडले होते. यानंतर खान यांनी लष्कराविरोधात वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. त्यांनी बाजवा यांना देशद्रोही म्हटले. रविवारी एका सभेत खान यांनी एक वरिष्ठ लष्करी अधिकारी फैसल नसीर यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. त्यानंतर सोमवारी लष्कराच्या मीडिया शाखेने एक व्हीडीओ जारी केला. त्यात म्हटले की, खान चुकीचे आरोप करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यानंतर इम्रान खान यांनी मंगळवारी इस्लामाबाद हायकोर्टातून बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा एक व्हीडीओ जारी केला. त्यात ते म्हणाले की, पाकिस्तान फक्त लष्कराचा नाही. मी सत्य सांगितले आहे. एका लष्करी अधिकाऱ्याने मला मारण्याचा दोनदा कट रचला आहे. मला मृत्यूची भीती वाटत नाही. यानंतर त्यांनी लगेचच उच्च न्यायालयात धाव घेतली. येथेच पाकिस्तान रेंजर्सने त्यांना अटक केली.