ब्ल्यू टिक हवी तर स्वतः पैसे मोजा
#न्यूयॉर्क
ट्विटरने ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शनसाठी शुल्क लागू केल्यानंतर आता अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने हे शुक्ल भरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. व्हाईट हाऊसने या संबंधी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक ई-मेल केला असून त्यामध्ये ब्लू टिकसाठी एक संस्था म्हणून व्हाईट हाऊसकडून पैसे भरण्यात येणार नाहीत, तसेच कर्मचाऱ्यांच्या पर्सनल खात्यांसाठीही पैसे भरण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना ब्ल्यू टिक कायम ठेवायची आहे त्याने स्वतःच्या खिशातून ही रक्कम भरावी, अशी तंबी व्हाईट हाऊसच्या वतीने देण्यात आली आहे.
ट्विटरची ब्ल्यू टिक ज्यांना हवी आहे त्यांच्यासाठी शुल्क लागू करण्याचे इलॉन मस्क यांनी जाहीर केले आणि जगभरात ब्ल्यू टिकसाठी पैसे भरण्याबाबत वाद सुरू झाला आहे. व्हाईट हाऊसने या संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना एक ई-मेल केला आहे. या मेलमध्ये, ट्विटर ही एक व्यावसायिक सेवा असून संस्थांसाठी ब्लू टिक व्हेरिफिकेशन सेवा देते. यामध्ये आता काही बदल सुरू असून व्हाईट हाऊस त्यावर नजर ठेवून आहे. त्यामुळे व्हाईट हाऊसच्या अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी आम्ही शुल्क भरणार नाही. जर कर्मचाऱ्यांना ही सेवा हवी असल्यास त्यांनी स्वतःच्या खिशातून हे शुल्क भरावे, असे म्हटले आहे.