अमेरिकेत आता हिंदुद्वेष हा गंभीर गुन्हा
#वॉशिंग्टन
अमेरिकेतील जॉर्जिया प्रांताने हिंदुद्वेष हा आता गंभीर गुन्हा असल्याचे जाहीर केले आहे. या प्रस्तावानुसार या प्रांतात हिंदू धर्माचा द्वेष करणे, हिंदूंची बदनामी करणे हा गंभीर गुन्हा मानला जाणार आहे. असे करणाऱ्या व्यक्ती वा व्यक्तिसमूहास कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जॉर्जियाच्या सभागृहात हे विधेयक मांडण्यात आले आहे. असे विधेयक मांडणारे जॉर्जिया हे अमेरिकेतील पहिलेच राज्य ठरले आहे.
हिंदू हा जगभरातील सर्वात मोठ्या आणि जुन्या धर्मापैकी एक असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. जगभरातील १०० पेक्षा जास्त देशांत १.२ अब्ज हिंदू वास्तव्य करतात. परस्परसहिष्णुता, मानवतावाद, शांतातापूर्ण सहजीवन ही या धर्माची मूलतत्त्वे आहेत. जगभरातील विविध श्रद्धा, विविध परंपरांचा सन्मान करणारी ही जीवनपद्धती आहे. या धर्मात हिंसाचार आणि द्वेष यांना थारा नसल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
लॉरेन मॅक्डोनाल्ड आणि टॉड जोन्स या जॉर्जियाच्या राज्य सभागृहाच्या सदस्यांनी सभागृहात हे विधेयक सादर केले. अत्यंत शांतता आणि सौजन्याने ते अमेरिकेतील संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत. संशोधन, माहिती-तंत्रज्ञान, औषधनिर्मिती सेवा, वित्त, ऊर्जा अशा सर्वच क्षेत्रात या हिंदूंनी मोठे योगदान दिलेले आहे. योग, आयुर्वेद, ध्यानधारणा, संगीत, पाककला, या क्षेत्रात हिंदू समुदायातील लोकांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे यापुढे हिंदू धर्माबद्दल द्वेष पसरवणे, त्यांना इजा पोहचवणे, हिंसाचार भडकावणे गंभीर गुन्हा मानले जाईल. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या हिंदू धर्माच्या अनुयायांनी कधीही आपले विचार लादण्याचा प्रयत्न केलेला नाही, विविध संस्कृती, परंपरांशी समरस होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
वृत्तसंस्था