येत्या पाच वर्षांत तापमानात सर्वोच्च वाढ
#जिनेव्हा
येत्या पाच वर्षांत जागतिक तापमानात वाढ होण्याची शक्यता असून २०२३ ते २०२७ ही पाच वर्षे आजवरील सर्वाधिक तापमानवाढीची ठरतील, असे भाकीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामानशास्त्र संघटनेने केले आहे. या पाच वर्षांतील एखाद्या वर्षी २०१६ च्या तापमानवाढीचा विक्रम मोडू शकेल, अशी शक्यताही संघटनेने वर्तवली आहे. हरितगृह वायूंचे उत्सर्जन आणि एल निनोचा परिणाम या दोन्हींचा फटका जगाला बसणार आहे.
२०१६ ला जगाने तापमानवाढीच्या झळा सोसल्या आहेत. २०१५ ते २०२२ दरम्यान आजवरील सर्वाधिक आठ उष्ण वर्षांची नोंद करण्यात आली आहे. मात्र आता हवामान बदलाचा वेग वाढल्यामुळे जागतिक तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या मते पुढील पाच वर्षांमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढण्याची ९८ टक्के शक्यता आहे. हरितगृहातून उत्सर्जित होणारे रासायनिक वायू आणि एल निनो या दोन्हींच्या एकत्रित दुष्परिणामामुळे हवामान बदलाचा वेग वाढला आहे. ज्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
२०१५ साली पॅरिस करारात सहभागी सर्व देशांनी तापमानवाढ रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. त्यावेळी सर्व देशांनी १८५० ते १९०० दरम्यान मोजलेल्या सरासरी तापमानापेक्षा २ अंश सेल्सियस आणि शक्य असल्यास १.५ अंश सेल्सियसपर्यंतच जागतिक तापमानवाढ मर्यादित राखण्याबाबत सहमती दर्शवली होती. मात्र या करारात नमूद केलेली तापमानवाढीची पातळी येत्या पाच वर्षांत ओलांडली जाणार असल्याचेही संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघटनेने म्हटले आहे. जर जगाचे तापमान एक किंवा दोन दशकांपर्यंत १.५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त वाढले तर त्याचे परिणाम भयंकर होतील. मोठ्या उष्णतेच्या लाटा, जंगलातील आग, तीव्र वादळे आणि पूर येण्याची शक्यता अधिक असेल. याशिवाय इंडोनेशिया, अॅमेझॉन आणि मध्य अमेरिकेत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. त्याऐवजी, उत्तर युरोप, अलास्का आणि सायबेरियामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने हरितगृह वायू उत्सर्जन २०२५ पूर्वी शक्य तेवढ्या प्रमाणात आणि २०३० पर्यंत ४३ टक्क्यांनी कमी होण्याचे आवाहन केले आहे. जगातील अनेक देश सध्या या कराराचे पालन करण्यात अपयशी ठरत आहेत, उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास प्रगत देश टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे.
एल-निनोच्या दुष्परिणामांना नासाचाही दुजोरा
नासाच्या म्हणण्यानुसार, मार्च-एप्रिल दरम्यान प्रशांत महासागरातील उबदार पाण्याची लाट दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनार्यापासून पूर्वेकडे आली होती. यामुळेच आधी थंडी पडली आणि नंतर अचानक उष्णता वाढली. या लाटा एल-निनोच्या आधीच्या लाटा म्हणूनही ओळखल्या जातात. नासाने जारी केलेल्या नकाशात लाल आणि पांढऱ्या रंगाचे समुद्राचे क्षेत्र दिसत आहे, तिथे गरम पाणी वाहात आहे. या गरम पाण्यामुळे देशाच्या विविध भागात भयंकर उष्मा वाढणार आहे. त्यानंतर पावसाळा येणार आहे. दरम्यान पृथ्वीवर यापूर्वीही अनेक वेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिकाच्या बर्फांच्या अस्तरीकरणाच्या वेगात झालेल्या वाढीत दिसून येतात. मात्र त्या वेळेची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्याही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे हरितगृह वायू उत्सर्जनामुळे होत आहे.