म्हणून वाढवली गाढवांची संख्या
#इस्लामाबाद
एकीकडे भारत जगभरातील अनेक देशांची क्षेपणास्त्रे अवकाशात प्रक्षेपित करण्याचे व्यावसायिक विक्रम रचत असतानाच पाकिस्तान सरकार गाढव आणि कुत्रे विकून डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी धडपड करत आहे. मागच्या एक वर्षात पाकिस्तानमधील गाढवांची संख्या एक लाखाने वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्रालयाने ही माहिती माध्यमांसमोर उघड केली आहे.
पाकिस्तानच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार गेल्या वर्षभरात देशात गाढवांची संख्या एक लाखाने वाढली आहे. म्हणजेच गेल्या वर्षी जी संख्या ५७ लाख होती. ती आता ५८ लाखांवर पोहोचली आहे. यापूर्वी २०१९-२०२० मध्ये देशात ५५ लाख गाढवे होती. २०२०-२०२१ मध्ये ही संख्या ५६ लाखांवर पोहोचली होती. दरम्यान पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या एवढ्या वेगाने का वाढत आहे, पाकिस्तान एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गाढवांचे काय करत आहे, असा प्रश्न पडतो. मात्र पाकिस्तान ही गाढवे चीनला विकत असल्याचेही समोर आले आहे.
गाढवांच्या मोबदल्यात चीन देतोय आकर्षक मोबदला
चीन पाकिस्तानमधून गाढव आणि कुत्रे आयात करत आहे. कारण गेल्या काही वर्षांत चीनमध्ये त्यांची मागणी खूप वाढली होती आणि उत्पादन कमी झाले होते. चीनने पाकिस्तानसोबत हा करार केला आणि पैशांची गरज असलेल्या पाकिस्तानने या करारावर स्वाक्षरी केली. त्यानुसार पाकिस्तान सरकार गाढव, कुत्रे निर्यात करत आहे.
पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रकल्प राबवले जात आहेत. ३ हजार एकर जमिनीवर गाढव पैदास केंद्र सुरू करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्रालय आणि आयात-निर्यातीच्या स्थायी समितीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही माहिती उघड झाली आहे.
एका अहवालानुसार, २०२१ मध्ये पाकिस्तान दरवर्षी ८० हजार गाढव चीनला पाठवत असे आणि त्या बदल्यात त्यांना चांगली किंमत दिली जात असे. एवढेच नाही तर पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढवण्यासाठी चीनने येथे मोठी गुंतवणूक केली होती.
का वाढली आहे चीनमध्ये गाढवांची मागणी ?
वास्तविक चीन पारंपरिक औषध बनवण्यासाठी गाढवांचा वापर करतो. जिलेटिन हे औषध गाढवांच्या त्वचेपासून तयार केले जाते. या जिलेटिनसाठी, प्रथम गाढवांना मारले जाते, नंतर त्वचा काढून टाकली जाते आणि उकळून जे तेल काढले जाते त्यापासून जिलेटिन औषध बनवण्यात येते. या जिलेटिनपासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे तयार केली जातात.
पैशांसाठी गाढव आणि कुत्र्यांची विक्री
पाकिस्तानची आर्थिक अवस्था जगापासून लपून राहिलेली नाही. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नाक रगडले तरीही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) पाकिस्तानला नव्याने कर्ज द्यायला तयार नाही. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा एकमेव मित्र देश असलेल्या चीनसमोर हात पसरावे लागले आहेत. कर्जबाजारी पाकिस्तानची अवस्था इतकी बिकट आहे की, त्यातून सावरण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. पाकिस्तानच्या याच दुरवस्थेचा लाभ उचलत चीनने पाकिस्तानला गाढवांची संख्या वाढवायला भाग पाडले आहे. चीनमध्ये गाढवांना खूप मोठी मागणी आहे. चीनने पाकिस्तानकडे गाढवांचा पुरवठा करण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे. जगभरात गाढवांच्या सर्वाधिक संख्येच्या बाबतीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनने पाकिस्तानमध्ये गाढवे पाळण्यासाठी मोठी गुंतवणूकही केली होती.