रशिया-युक्रेन सीमेवर सुरतच्या हेमिलचा क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू
हेमिल यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हेमिल हा गुजरातच्या सुरतमधील पाटीदार वराछा येथील आनंदनगरवाडीचा रहिवासी होता.
हेमिलचे वडील अश्विन मंगुकिया एम्ब्रॉयडरी युनिटमध्ये काम करतात. मुलाच्या मृत्यूमुळे ते खूप दु:खी झाले आहेत. अश्विन यांनी सांगितले की, आमची भारत सरकारला नम्र विनंती आहे की, त्यांनी रशियन अधिकाऱ्यांशी बोलून मुलाचा मृतदेह मूळ गावी सुरत येथे आणण्यासाठी मदत करावी. त्याचे पार्थिव कोठे आहे हे देखील आम्हाला माहीत नाही. आम्ही तेथील कोणाच्याही संपर्कात नाही. आम्ही असाहाय्य आहोत. हेमिलशी २० फेब्रुवारीला शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर २१ फेब्रुवारीला त्याचा मृत्यू झाल्याचे कळले. तो तेथे कोणती नोकरी करत होता, याची आम्हाला काहीही माहिती नाही. तो रशियामध्ये मदतनीस म्हणून काम करतो, एवढेच आम्हाला कळले होते. नंतर कळले की हेमिलला युक्रेनच्या सीमेवर युद्धक्षेत्रात पाठवण्यात आले होते.
अश्विन म्हणाले की, आम्हाला २३ फेब्रुवारीला हेमिलच्या मृत्यूची बातमी मिळाली. ही माहिती हैदराबादचा रहिवासी असलेल्या इम्रानने आम्हाला फोन करून दिली. युद्धक्षेत्रात क्षेपणास्त्र हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. इम्रानचा भाऊ हेमिलसोबत युद्धात होता. त्याने आम्हाला या घटनेबद्दल सांगितल्यावर आम्ही पूर्णपणे हादरलो. २० फेब्रुवारीला आम्ही त्याला विचारले की तो कोणत्या प्रकारचे काम करत आहे, तेव्हा त्याने आम्हाला जास्त काहीही सांगितले नाही.
उपलब्ध माहितीनुसार हेमिलने १२ वी नंतर शाळा सोडली आणि त्याच्या चुलत भावांसोबत एक छोटासा भरतकामाचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, याच काळात हेमिल रशियामध्ये हेल्परच्या नोकऱ्या देणाऱ्या वेबसाइटद्वारे एजंटाच्या संपर्कात आला होता.