एकमेव महासत्तेला जड कर्जाचे ओझे
#वॉशिंग्टन
जगातील एकमेव आर्थिक महासत्ता असे बिरुद मिरवणारी अमेरिका कफल्लक होण्याच्या मार्गावर आहे. एकापाठोपाठ एक बँका बंद पडत असल्याने आणि जागतिक बाजारातील डॉलरची पत घसरल्याने अमेरिका आर्थिक संकटात सापडली आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम जगाच्या अर्थकारणावरही होण्याची शक्यता आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असून येत्या जून महिन्यात कर्ज फेडण्यासाठी बायडेन सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे कर्जमर्यादा वाढवण्याशिवाय अन्य पर्याय उरला राहिला नसल्याचे अर्थमंत्री जनेट येलेन यांनी स्पष्ट केले आहे.
या आर्थिक संकटावर मात करण्यासाठीच राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी येत्या ९ मे रोजी एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. बायडेन यांनी काँग्रेसच्या चार प्रमुख नेत्यांना व्हाईट हाऊसमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी पाचारण केले आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची आणि निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकन काँग्रेसचे सभापती केविन मॅक्कॉर्थी, सभागृहातील विरोधी पक्षनेते हकीम जेफरीज, वरिष्ठ सभागृहातील चक शूमर, मिच मॅककॉनेल हे चौघे या बैठकीत सहभागी होणार आहेत.
कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जमर्यादा वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे बायडेन सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. आजवर अनेक वेळा कर्जाची मर्यादा वाढवली जाणार नसल्याचे सांगत ती वाढवण्यात आली आहे. बायडेन यांनीही गत महिन्यात कर्जमर्यादा वाढवणार नसून सरकार खर्चात कपात करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता कर्जमर्यादा वाढवण्याशिवाय सरकारसमोर गत्यंतर उरले नसल्याचे अर्थमंत्री येलेन यांनीच कबूल केल्यामुळे बायडेन हाच निर्णय घेणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
यदाकदाचित बायडेन सरकारने कर्जमर्यादा वाढवण्यापेक्षा खर्च कपातीचा निर्णय घेतला तर अमेरिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, ज्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसू शकतो. अमेरिकेत सत्ताधारी डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन नेत्यांमध्ये कर्जमर्यादा वाढवण्याबाबत एकमत होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर दीर्घ चर्चा होईल. येलेन यांनी सभापती केविन मॅक्कॉर्थी यांना या संदर्भात पत्र पाठवले असून कर्जमर्यादा वाढवणे हाच पर्याय असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला आहे.
जूनपूर्वी काँग्रेसने वाढवावी कर्जमर्यादा
जर काँग्रेसने कर्जमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला नाही तर बायडेन सरकार १ जूनपर्यंत आपल्या खर्चात कपात करू शकते. खर्चात कपात करायचा निर्णय घेतल्यास अनेक महत्त्वाकांक्षी निर्णयावर दुष्परिणाम होतील. सरकारकडे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा खर्च भागवता येईल, एवढाच निधी शिल्लक आहे. त्यानंतर सरकारकडे खर्च भागवण्यासाठी पैसे नसतील, त्यापूर्वीच काँग्रेसने कर्जमर्यादा वाढवायला हवी, असा इशारा येलेन यांनी दिला आहे.
आणखी एक बँक बुडाली
दरम्यान अमेरिकेतील आणखी एक बँक बुडाली आहे. कॅलिफोर्नियाच्या नियामकांनी फर्स्ट रिपब्लिक बँक जप्त केली आहे. जेपी मॉर्गन चेसने बँकेच्या सर्व ठेवी आणि मालमत्तेवर ताबा मिळवला आहे. फर्स्ट रिपब्लिक बँक ही गेल्या दोन महिन्यांत बुडालेली तिसरी मोठी अमेरिकन बँक आहे. फर्स्ट रिपब्लिक बँकेची एकूण मालमत्ता २२९.१ अब्ज डॉलर होती. सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँकेच्या अपयशानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बंद होणारी फर्स्ट रिपब्लिक बँक ही तिसरी बँक आहे.