ओव्हर टाईमची डोकेदुखी
#बीजिंग
आपल्या नियोजित कामाच्या वेळेव्यतिरिक्त कार्यालयात काम करायचे आणि त्याचे जास्त पैसे घ्यायचे, हा एकेकाळी कामगारवर्गात आवडीचा विषय होता. त्यामुळे बहुतांश कामगार ओव्हरटाईम करायला लगेच तयार होत. आता काळ बदलला, कामगारांच्या खासगी आयुष्याला मोल आले आणि ओव्हरटाईम ही कल्पना डोकेदुखी बनली आहे. याच डोकेदुखीविरुद्ध चीनमध्ये एका युवतीने न्यायालयात दाद मागत या कार्यसंस्कृतीचा विषय उजेडात आणला आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने तिला न्याय देत नुकसानभरपाई देण्याचे आदेश तिच्या कंपनीला बजावले आहेत.
ओव्हरटाइम काम करणे सध्याच्या वर्क कल्चरमधे फार सामान्य झाले आहे. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांच्या खासगी आयुष्यात ताण निर्माण होतो. एका तरुणीने मात्र या विरोधात आवाज उठवला. तिने कंपनीविरोधात थेट न्यायालयात तक्रार केली. या प्रकरणात तिला यशही मिळाले. तसेच तरुणीला नुकसान भरपाईसुद्धा मिळाली. ओव्हरटाइम वर्क कल्चरच्या बाबतीत बरेच देश आज आघाडीवर आहेत. बऱ्याच लोकांनी आता याची दखल घ्यायला सुरुवात केली आहे, तर काही लोक नोकरी जाण्याच्या भीतीने शांतदेखील बसतात. मात्र एका तरुणीने या विरोधात बिनधास्तपणे तक्रार दाखल केली आहे.
हे प्रकरण चीनमधील असून ही तरुणी आयटी कंपनीमधे कार्यरत होती. जेथे कंपनीतून बाहेर पडल्यानंतरसुद्धा तास न् तास कंपनीच्या मेसेजेसचे रिप्लाय द्यावे लागे. यामुळे तिच्या व्यक्तिगत आयुष्यात फार तणाव निर्माण झाला होता. तिने या विरोधात न्यायालयात दाद मागत न्यायाची मागणी केली. तरुणीच्या तक्रारीनंतर न्यायालयात या विषयावर सुनावणी झाली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, महिलेला झालेल्या मानसिक त्रासाच्या बदल्यात कंपनीने तिला नुकसान भरपाई म्हणून ३००० युआन (३.५५ लाख रुपये) देण्याचे आदेश दिले आहेत. महिलेने दावा केला होता की तिने एका वर्षात जवळपास २००० तास जास्त काम केले होते. या अतिरिक्त वेळेत तिचा जास्तीत जास्त वेळ कंपनीच्या मेसेजेसचे रिप्लाय देण्यात गेला असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाचा निकाल महिलेच्या बाजूने लागला आणि महिला ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीस महिलेच्या अतिरिक्त कामाची भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. तिच्या सहकारी महिलांसाठी ही फार मोठी गोष्ट ठरली आहे. कारण चीनमधे कामगारांसंबंधित कायद्याचे पालन फारसे गांभीर्याने केले जात नाही.
दरम्यान चीनमधे कर्मचाऱ्यांकडून आठवडाभर काम आणि २४ तास ऑनलाइन अॅक्टिव्ह राहण्याची अपेक्षा केली जाते. तरुणीच्या बाजूने लागलेला निकाल आता या कंपन्यांसाठी एक मोठा धडा ठरणार आहे. महिलेच्या तक्रारीनंतर आता व्हॉट्सअॅप आणि व्हिचॅट सारख्या मेसेजिंग अॅपच्या लीगल स्टेट्सबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. कामानंतरही मेसेजेसवर अॅक्टिव्ह राहणे ओव्हरटाईम नियमांत मोडले जाईल का असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधे निर्माण झाला आहे.
वृत्तसंस्था