आजीबाईंनी मोजली हँडसम म्हणण्याची किंमत
#मॉस्को
रशिया-युक्रेन युद्धामुळे या दोन्ही देशांच्या नागरिकांच्या परस्परांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल व्हावा, अशी अपेक्षा दोन्ही देशातील सत्ताधारी पक्षांना वाटणे स्वाभाविक आहे. मात्र युध्दपूर्व काळात परस्परांशी असलेला स्नेहभाव केवळ सरकार म्हणते आहे म्हणून नष्ट होणे शक्य नसते. याचा फटका रशियातील एका ज्येष्ठ महिलेला बसला आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे कौतुक करणे या ७० वर्षीय आजीबाईला महागात पडले आहे. त्यासाठी तिला ४० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
सख्खे शेजारी असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला एक वर्ष उलटून गेले आहे. युद्धानंतर रशिया आणि युक्रेन आता शत्रू आहेत. ओल्गा स्लेगिनम या आजीबाईंनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांना 'विनोदबुद्धी असणारा हँडसम व्यक्ती' असे म्हटले. आता यात वावगे काहीच नव्हते. मात्र रशियाचे युक्रेनसोबत युद्ध सुरू असताना शत्रू देशाच्या प्रमुखाचे कौतुक करणे हा रशियन सैनिकांचा अपमान असल्याचा दावा करत रशिया सरकारने तिची कृती देशद्रोह ठरवली आहे. एवढेच नाही तर तिच्यावर न्यायालयात खटला भरण्यात आला.
रशियातील मानवाधिकार संघटनेने ओल्गा स्लेगिनम यांनी शत्रू देशाच्या प्रमुखाचे कौतुक करून देशाचा, देशाच्या सैनिकांचा अपमान केला असल्याचा दावा केला आहे. त्यांच्यावर न्यायालयात खटला भरला आहे. झेलेन्स्की आपले शत्रू आहेत, त्यामुळे युद्धाच्या दरम्यान असे त्यांचे कौतुक करणे युद्धगुन्हा आहे. तुम्हाला कौतुकच करायचे असेल तर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे करा, असेही संघटनेचे म्हणणे आहे. ओल्गा स्लेगिनम यांच्यावर दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना ४० हजारांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. ओल्गा स्लेगिनम यांनी एका हॉटेलमध्ये जेवायला गेलेले असताना हे विधान केले होते.
वृत्तसंस्था