रशियामध्ये भारतीयांची फसवणूक
#मॉस्को
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच पाश्चात्य देशांना इशारा दिला होता की, त्यांनी युक्रेनला युद्धात मदत करत राहिल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. दरम्यान, रशियामध्ये भारतीयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. रशियाने या तरुणांना जबरदस्तीने सैन्यात भरती केले. यानंतर त्यांना युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले, असा दावा पंजाबमधील होशियारपूर येथील रहिवासी असलेल्या ७ तरुणांच्या गटाने केला आहे. या तरुणांनी भारत सरकारकडे मदतीसाठी आवाहन केले आहे.
रशियात अडकलेल्या या भारतीयांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासाठी कधीही पाठवले जाऊ शकते. दुसरीकडे, १०५ सेकंदाचा या तरुणांचा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे तरुण एका अस्वच्छ खोलीत उभे आहेत. त्यापैकी गगनदीप सिंह नावाचा एक तरुण आपबीती सांगताना दिसत आहे. तर उर्वरित ६ जण त्याच्याबरोबर उभे असलेले दिसत आहेत. गगनदीप व्हीडीओमध्ये सांगत आहे की, ''आम्ही सर्वजण नवीन वर्षात रशियाला भेट देण्यासाठी गेले होतो. दरम्यान, एजंटने आम्हाला अनेक ठिकाणी फिरवले. यानंतर एजंटने सांगितले की, तो त्यांना बेलारुसला घेऊन जाईल. मात्र, बेलारुसला जाण्यासाठी व्हिसा लागतो हे आम्हाला माहिती नव्हते. यानंतर एजंटने आमच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. दरम्यान, प्रत्येकाने जे काही पैसे होते ते एजंटला दिले. मात्र त्याने आम्हा सर्वांना एका रस्त्यावर सोडले, जिथे पोलिसांनी आम्हाला पकडले आणि रशियन सैन्याच्या ताब्यात दिले. रशियन सैन्याने धमकी दिली की, प्रत्येकाने हे काम करण्यासाठी करारावर स्वाक्षरी करावी, अन्यथा त्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल. यानंतर लष्कराने सर्वांच्या सह्या घेतल्या आणि त्यांचे प्रशिक्षण सुरु केले. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात आले. गगनदीपने सांगितले की, त्यांना बंदूक कशी वापरायची हे देखील माहित नाही. युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासाठी रशिया कधीही त्यांना सीमेवर तैनात करु शकतो. यापूर्वीही, अनेक भारतीयांना युद्धासाठी पाठवले आहे.
रशिया-युक्रेन सीमेवर चार भारतीयांना रशियन सैनिकांबरोबर लढण्ययासाठी पाठवण्यात आले. यातील एक तेलंगणातील तर तीन कर्नाटकातील आहेत. रशियन कंपन्यांनी या भारतीयांना मदतनीस म्हणून कामावर ठेवल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. यानंतर, त्यांना रशियाचे खाजगी सैन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॅगनर ग्रुपमध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांना युद्धभूमीवर घेवून जाण्यात आले. या लोकांच्या नातेवाईकांनी सांगितले की, 'डिसेंबर २०२३ मध्ये काही एजंटनी नोकरीच्या नावाखाली त्यांची रशियात फसवणूक केली.' आता हे भारतीय मदतीसाठी याचना करत आहेत.