संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे एका प्रचार सभेत बोलताना हल्लेखोराने गोळीबार केला आहे. गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली असून यात जखमी झालेल्या ट्रम्प यांच्या कानाजवळ रक्तस्राव झाल्याचे दिसत होते. या घटनेने जगभर खळबळ माजली असून विविध देशांच्या प्रमुखांनी याचा तीव्र निषेध केला आहे. सिक्रेट सर्व्हिसने केलेल्या गोळीबारात हल्लेखोर मारला गेला असून त्याचे नाव थॉमस क्रूक्स असे आहे.
ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये बटलर या ठिकाणी सभेत भाषण करत असताना हा हल्ला झाला. गोळी दोन सेमीने चुकली अन्यथा ट्रम्प यांचा जीव गेला असता. गोळीबाराचा व्हीडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सभेत गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्यावर ट्रम्प लागलीच व्यासपीठामागे लपले. गोळीबाराचा आवाज येत असताना ट्रम्प यांच्या कानाला चाटून गोळी गेली. त्यामुळे ते पटकन खाली कोसळले. जमावामध्ये निर्माण झालेल्या भयाच्या वातावरणात गुप्तहेर खात्याने लगेच ट्रम्प यांना घेराव घातला.
त्यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला रक्ताचे डाग दिसत होते. ते उभे राहून हात उंचावताच गर्दीतून आवाज आला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी ट्रम्प यांना तातडीने खाली उतरवलं आणि कारमध्ये बसवून घटनास्थळापासून दूर नेलं. सिक्रेट सर्व्हिस आणि ट्रम्पच्या कार्यालयाने ते सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. हल्ल्यानंतर ट्रम्प न्यू जर्सी येथे गेले. विमानातून उतरतानाचा त्यांचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.
प्रत्यक्षदर्शी म्हणतो...
ज्या इमारतीच्या छतावर शूटर होता तिथल्या एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना शूटरबद्दलची माहिती दिली होती. पोलिसांना सांगूनही त्यांनी ट्रम्प यांना व्यासपीठावरून खाली उतरवलं नाही, असा दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे. प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितलं की “प्रचारसभेच्या ठिकाणाच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या छतावर आम्ही एका रायफलधारी व्यक्तीला पाहिलं. ती व्यक्ती रांगत पुढे सरकत होती. तो इसम बराच वेळ छतावर होता.
त्यानंतर आम्ही याबाबत पोलिसांना कळवलं. पोलिसांना माहिती दिल्यानंतर बराच वेळ ट्रम्प यांचं भाषण चालू होतं. त्यावेळी आम्हाला प्रश्न पडला की, पोलिसांनी ट्रम्प यांना अजून व्यासपीठावरून खाली का उतरवलं नाही? तसेच पोलिसांनी अद्याप त्या रायफलधारी माणसाला का पकडलं नाही? तेवढ्यात आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकला आणि ट्रम्प जमिनीवर कोसळले. मी पोलिसांना माहिती दिल्यानंतर सिक्रेट सर्व्हिसचे जवान छताकडे पाहात होते. तेव्हा मी त्यांना हाताने इशारा करून त्या छताकडे पाहण्याचा (जिथे रायफलधारी इसम बसला होता) इशारा करत होतो. मात्र सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी कारवाई करायच्या आधीच ट्रम्प जमिनीवर कोसळले होते.
सभेच्या आसपास ज्या इमारती आहेत, सभेपूर्वी त्या इमारतींच्या छतांवर टेहळणी का केली गेली नाही? सपूर्ण परिसरात तपास केला होता का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. एफबीआय एजंटने सांगितले की, संशयिताकडे ओळखपत्र नसल्यामुळे त्याच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी डीएनए चाचणी केली. आता त्याची ओळख पटवण्यात आली. बटलर फार्म शो मैदानावरील स्टेजपासून १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या एका इमारतीच्या छतावर क्रूक्स लपून बसला होता. या मैदानाच्या दक्षिणेस ५० किमीवर बेथेल पार्क हे गाव आहे. क्रूक्सकडून नंतर रायफल जप्त करण्यात आली आहे.
सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी म्हणाले की, गोळीबारानंतर संरक्षणात्मक उपाय लागू केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ट्रम्प सुरक्षित आहेत. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे. त्याची माहिती जसजशी उपलब्ध होईल तसतशी माहिती जाहीर केली जाईल. ट्रम्प यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी सिक्रेट सर्व्हिसने सर्व आवश्यक पावले उचलली आहेत.
हल्लेखोर क्रूक्स ठार
हल्लेखोर मारला गेल्याने या प्रकरणाचा तपास लागण्याकरता कदाचित काही महिने किंवा वर्ष लागू शकतील. प्रचारसभेत गोळीबाराचा चार वेळा आवाज आला. गोळीबाराचा आवाज येताच सगळेजण खाली वाकले. गोळीबार सुरू असताना सारेजण खाली वाकले होते. याचवेळी ट्रम्पही खाली वाकले. नंतर सिक्रेट सर्व्हिसने त्यांना संरक्षण दिले. काही सेकंदात हे सर्व घडलं. यावेळी एक व्यक्ती पळून जात असताना लष्करी गणवेशातील अधिकारी त्याचा पाठलाग करत होता. त्यावेळीही गोळ्यांचा आवाज ऐकू आला.
गोळीबार करणाऱ्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. यातील एक हल्लेखोर मारला गेला आहे. फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली आहे. तो २० वर्षीय तरुण असून थॉमस क्रूक्स असं त्याचं नाव आहे. ट्रम्प यांच्यावर गोळीबार करताक्षणी सिक्रेट सर्व्हिसने प्रतिहल्ला केला. या प्रतिहल्ल्यात थॉमस मॅथ्यू क्रूक्सचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेचा हत्येचा प्रयत्न म्हणून तपास केला जात आहे. सिक्रेट सर्व्हिसच्या माहितीनुसार हल्लेखोर बाहेरून आलेले दिसत होते.
गोळीबारानंतर ट्रम्प निवेदनात म्हणतात की, गोळीबारावर जलद प्रतिसाद दिल्याबद्दल अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिस आणि कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांचा मी आभारी आहे. आपल्या देशात असे कृत्य घडणे हे अविश्वसनीय आहे. जो हल्लेखोर मरण पावला आहे, याबद्दल सध्या काहीही माहिती नाही. गोळी उजव्या कानाच्या वरच्या भागाला लागली तेव्हा मला लगेच कळले की काहीतरी गडबड आहे. मी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि माझ्या त्वचेतून काहीतरी बाहेर पडल्यासारखं वाटलं. खूप रक्तस्राव झाला, मग मला कळले की काय होत आहे.