फेमिनिस्ट मर्लिन झळकल्या 'प्लेबॉय'वर
#पॅरिस
‘प्लेबॉय’ या प्रौढांसाठीच्या मासिकाला मुखपृष्ठासाठी पोझ देणे स्त्रीवादी लेखिका आणि फ्रान्सच्या मंत्री मर्लिन स्कॅपा यांना महागात पडणार असल्याची शक्यता आहे. इतरवेळी महिला हक्क आणि स्त्री-पुरुष समतेसाठी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असणाऱ्या त्यांच्या सरकारमधील सहकाऱ्यांनीही त्यांच्या प्लेबॉयवरील छबीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्लेबॉयच्या कव्हर पेजवरील त्यांचे छायाचित्र त्यांच्या मंत्रिपदासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
प्लेबॉयसाठी दिलेले छायाचित्र हेसुद्धा फेमिनिस्ट पाऊल असल्याचे सांगत मर्लिन स्कॅपा यांनी त्यांच्या कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. फ्रेंच सरकारमधील सामाजिक अर्थव्यवस्था आणि संघटनामंत्री मर्लिन स्कॅपा या काहीतरी हटके करण्यासाठी आणि वादग्रस्त विधानासाठी ख्यातनाम आहेत. पण या वेळेस पंतप्रधान आणि त्यांच्या समर्थकांनाही त्यांचे हे धाडस फारसे पचनी पडलेले नाही. मर्लिन या अलीकडेच महिला आणि समलिंगी हक्क तसेच गर्भपात या विषयांवरील १२ पानांच्या मुलाखतीसह या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकल्या आहेत. ‘महिलांना त्यांच्या शरीराचे हवे ते करण्याचा अधिकार आहे. या हक्काचे सर्वत्र व सदैव रक्षण करण्यासाठी' असे शीर्षक देत स्कॅपा यांनी शनिवारी (१ एप्रिल) ट्विटरवर पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांना या धाडसासाठी देशभरातून कौतुकाची अपेक्षा होती. मात्र संपूर्ण फ्रान्समधून त्यांचे हे धाडस चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ग्लॅमर मासिकासाठी डिझायनर कपडे परिधान केलेल्या मर्लिन यांचा फोटो हा चुकीचा संदेश देणारा असल्याची प्रतिक्रिया सरकारमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आहे. स्वतः पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी हा प्रकार गैर असल्याचे सांगण्यासाठी मर्लिन यांना फोन केला असल्याचेही समोर आले आहे.
वृत्तसंस्था