प्रत्येक सहावा व्यक्ती वंध्यत्वाचा बळी
#जिनेव्हा
कधीकाळी वाढती लोकसंख्या हा जगातील बहुतांश देशांसाठी डोकेदुखीचा विषय बनला होता. मात्र आज अनेक देश जन्मदरात घट झाल्यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. त्यात भर म्हणून की काय जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एका अहवालाद्वारे जगभरातील महिला आणि पुरुषांच्या प्रजनन क्षमतेबाबत भाष्य केले आहे. जगातील प्रत्येक देशात वंध्यत्व अर्थात मूल जन्माला घालण्याची क्षमता कमी झालेल्यांची संख्या वाढली आहे.
सध्या चीन, जपान हे देश त्यांच्या घटत्या जन्मदरामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. लोकांनी लग्न करावीत आणि मुले जन्माला घालावीत, यासाठी तिथले सरकार प्रोत्साहन देत आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, जगातला प्रत्येक सहावा पुरुष आणि सहावी महिला ही वंध्यत्वाच्या आजाराने त्रस्त आहे. वंध्यत्व हा आजार केवळ शारीरिक कमतरतेपुरता मर्यादित नाही, आपण मूल जन्माला घालू शकत नाही, या कल्पनेने, समस्येने हजारोंच्या मनावर नकारात्मक परिणाम होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आपण आयुष्यात आई, बाप बनू शकत नाही, या विचाराने अनेकजण नैराश्यात जातात. याच अहवालातील माहितीप्रमाणे, जगातील १७.५ टक्के प्रौढ लोक वंध्यत्वाच्या आजाराने ग्रासले आहेत. जगभरात सर्वत्र हा आजार दिसून येतो आहे. योग्य वयात मूल जन्माला घालू न शकणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे श्रीमंत अथवा विकसित देशात वंध्यत्वाच्या आजाराने ग्रस्त लोकांची संख्या १७.८ टक्के आहे, तर गरीब अथवा विकसनशील देशात हे प्रमाण १६.५ टक्के आहे. म्हणजेच विकसनशील देशात विकसित देशापेक्षा हे प्रमाण कमी आहे.
वंध्यत्वावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय
डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात वंध्यत्वाच्या समस्येबाबत सविस्तर भाष्य केले आहे. वंध्यत्वाची समस्या अथवा हा आजार असाध्य नाही. त्यावर उपचार केले जाऊ शकतात. थोड्या काळासाठी वंध्यत्वाला सामोरे जाणाऱ्यांची संख्या जगभरात १२.६ टक्के आहे. गर्भनिरोधक साधने अथवा गर्भनिरोधक गोळीचा वापर न करता एखाद्या महिलेला एका वर्षात गर्भधारणा झाली नसेल तर ती महिला वंध्यत्वाला बळी पडली आहे, असे समजण्यात येते. बरीचशी जोडपी वंध्यत्वाच्या आजाराने त्रस्त असतात, मात्र त्वरित उपचाराला आलेल्या यशानंतर त्यांना अपत्याची प्राप्ती होते. त्यामुळे वंध्यत्व हा काही उपचारांनंतर बरा न होणारा आजार नाही. वेळीच उपचार केल्यावर संबंधिताला भविष्यात मूल होऊ शकते.
डब्ल्यूएचओने १९९० ते २०२१ दरम्यानच्या १३३ प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर,आकडेवारी तपासल्यानंतर हा अहवाल तयार केला आहे. यातील ६६ प्रकरणे पती-पत्नी अशी होती तर उर्वरित प्रकरणे युवक-युवतींची होती. बदलती जीवनशैली, आहारातील बदल यामुळे माणूस शांत, समाधानाने जगू शकत नाही. या बदलत्या जीवनशैलीमुळे पुरुषामध्ये अथवा महिलेत वंध्यत्वाची लक्षणे दिसू लागली आहेत. वेळीच उपचार केले नाहीत अथवा एकदा का आपण कधीच आई अथवा बाप बानू शकत नाहीत, या निराशेच्या घेऱ्यात अडकले की संबंधितांच्या आयुष्यात काहीच सकारात्मक बदल होऊ शकत नाहीत. मानसिक आरोग्य, आरामदायी जीवनशैली आणि लैंगिक संबंधांकडे डोळसपणे बघण्याची गरजही डब्ल्यूएचओने या अहवालात व्यक्त केली आहे.