स्वतःला संपवा, तुम्हाला येशू नक्की भेटेल...
#नैरोबी
तुम्ही स्वतःला संपवा, तुम्हाला येशू नक्की भेटेल, असे सांगत एक-दोन नव्हे तर तब्बल ४७ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या एका ख्रिश्चन धर्मगुरूला पोलिसांनी अटक केली आहे. आफ्रिकेतील केनियात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. केनिया पोलिसांनी हे मृतदेह उकरून बाहेर काढले आहेत. पूर्व केनियातील मालिंदी शहरात हा प्रकार घडला आहे.
येथील धर्मगुरू पॉल मॅकेन्जी नथेंगला पोलिसांनी अटक केली आहे. ज्या जमिनीत हे मृतदेह पुरण्यात आले आहेत ती त्याच्याच मालकीची जागा आहे. धर्मगुरू पॉल मॅकेन्जी नथेंगवर आरोप आहे की, त्याने येशूला भेटण्यासाठी त्याच्या अनुयायांना उपाशी राहण्याचे आवाहन केले होते. हे लोक अन्नपाण्याचा कण न घेता उपाशी राहिले आणि त्यातच त्यांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांनी या प्रकरणी नथेंगच्या सहा अनुयायांना ताब्यात घेतले आहे. नथेंगमुळे ४७ लोकांनी आपला जीव गमावला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे केनियात मोठी खळबळ उडाली आहे.
मालिंदीमधील शाकाहोला येथील एका जमिनीत खोदकाम करत असताना एकूण ४७ मृतदेह सापडले आहेत. यामध्ये लहान मुलांचेही मृतदेह आहेत.
मालिंदी गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख चार्ल्स कामाऊ म्हणाले की, सोमवारी केलेल्या खोदकामात आम्हाला आणखी २६ मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे आता घटनास्थळावरून मिळालेल्या एकूण मृतदेहांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. आम्ही आणखी मृतदेहांचा शोध घेत आहोत. धर्मगुरू पॉल मॅकेन्जी नथेंगने यापेक्षा जास्त लोकांचे जीव घेतले असण्याची शक्यता आहे, त्यामुळे आणखी आठवडाभर खोदकाम सुरू ठेवले जाणार आहे. याखेरीज धर्मगुरू पॉल मॅकेन्जी नथेंगच्या तावडीतून सुटका झालेल्या लोकांचाही शोध घेतला जात आहे. गेल्या आठवड्यात येथे एक मृतदेह सापडला होता. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान पॅथोलॉजिस्ट मृतदेहांच्या डीएनएचे नमुने घेतील आणि त्यानंतर या लोकांच्या मृत्यूमागचे कारण समोर येईल, असेही चार्ल्स कामाऊ म्हणाले आहेत. पोलिसांनी या शोधमाेहिमेसाठी मालिंदीमधील शाकाहोला येथील ८०० एकर (३२५ हेक्टर) जंगल सील केले आहे.
धर्मगुरू पॉल मॅकेन्जी नथेंगच्या मालकीच्या जमिनीत आणखी खोदकाम केले जाणार आहे. मागच्या आठवड्यात ‘गूड न्यूज इंटरनॅशनल’ चर्चमध्ये चार लोकांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. त्यामुळेच प्रथम धर्मगुरू पॉल मॅकेन्जी नथेंग आमच्या संशयाच्या जाळ्यात अडकला असल्याचे मालिंदीचे पोलीस प्रमुख जॉन केम्बोई यांनी सांगितले आहे. चर्चमधील एका सदस्याला आम्ही अशक्तपणा आल्याने बाजूला आणून बसवले. त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात येत होते. त्यासाठी पोटात अन्न असणे आवश्यक होते. आम्ही त्याला काहीतरी खाण्याचा आग्रह केला असता त्याने अन्नाचा एकही कण खाण्यास नकार दिला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हुसेन खालिद यांनी म्हटले. त्यामुळेच धर्मगुरू पॉल मॅकेन्जी नथेंगने या भोळ्या लोकांना उपाशी राहण्यासाठी भाग पाडल्याचे लक्षात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
वृत्तसंस्था