'अय्याश' युगाचा अंत
#रोम
इटलीचे सर्वाधिक श्रीमंत राजकारणी, माध्यमसम्राट आणि माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मिलान येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रक्ताचा कर्करोग झाल्याने मागील काही वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. १० जूनला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
इटलीतील सर्वाधिक श्रीमंत राजकारणी ही त्यांची ओळख होती. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी माध्यमसम्राट ही त्यांची ओळख होती. इटलीचा सर्वाधिक वादग्रस्त राजकीय नेता म्हणूनही बर्लुस्कोनी जगभरात ओळखले जात. तीन वेळा त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. १९९४ साली सिल्व्हियो पहिल्यांदाच पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. फोरजा इटालियन पक्षाला इटलीच्या राजकारणात महत्त्व प्रदान करून देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. उपचारांनंतर ते बरे झाले असल्याचे सांगण्यात आले होते. आपल्या बेधडक जीवनशैलीबाबत आणि कार्यपद्धतीबाबत घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना बर्लुस्कोनी यांनी कधीही जाहीरपणे उत्तरे दिली नाहीत. राजकारणात पदार्पण करण्यापूर्वी मी जसा जगत आलो त्यात बदल कसा करणार? राजकारणात येण्यापूर्वी उद्योगपती म्हणून माझी जी जीवनशैली होती, ती कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
'बुंगा बुंगा' सेक्स पार्टी
व्यक्तिगत आयुष्यात सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांची प्रतिमा प्लेबॉयसारखी होती. अनेक महिलांशी शारीरिक संबंध ठेवणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. २०११ साली ३३ महिलांशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्यातून ते निर्दोष सुटले. २०१३ साली एका १७ वर्षीय युवतीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी न्यायालयात त्यांना खुलासा द्यावा लागला होता. याशिवाय पंतप्रधान असताना सिल्व्हियो बर्लुस्कोनी नेहमीच बुंगा बुंगा पार्ट्या आयोजित करत होते. या पार्टीत सिल्व्हियो बर्लुस्कोनी एकाच वेळी शंभर ललनांसोबत नृत्य करत असायचे, असा खुलासा त्यांच्या निकटवर्तीयांनी केला होता. २०१८ साली बीबीसीच्या महिला पत्रकाराने सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांच्या बुंगा बुंगा पार्टीबाबत एक सविस्तर लेख प्रसिद्ध केला होता. त्यामुळेही इटलीत आणि जगभरात त्यांची बदनामी झाली होती.
भ्रष्टाचाराचे सर्वाधिक आरोप
२००८ ते २०११ दरम्यान उत्पन्नावरील करचुकवेगिरीप्रकरणी त्यांना कारावासाची शिक्षाही भोगावी लागली होती. दरम्यान इटलीचे पंतप्रधान असताना त्यांची कार्यपद्धती सतत माध्यमांच्या निशाण्यावर असायची. वादग्रस्त विधाने, कुठलाही सारासार विचार न करता निर्णय घेण्याच्या पद्धतीमुळे सिल्व्हियो नेहमीच प्रकाशझोतात असत. करचुकवेगिरीबद्दल कारावास भोगल्यानंतर सहा वर्षांसाठी त्यांना राजकारणात येण्यास मनाई करण्यात आली होती. कोरोनाकाळात त्यांच्यावर दीड वर्ष उपचार सुरू होते. २०२२ नंतर ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले होते. सत्तेत असताना त्यांच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयात गैरव्यवहार आढळून आल्याने चौकशी सुरू होती. उद्योगपतींच्या भल्यासाठी सत्तेचा दुरूपयोग केल्याचा आरोप सिल्व्हियो यांच्या सरकारवर सतत होत होता.