ब्रिटनमध्ये शिक्षणाच्या आयचा घो!
#लंडन
ब्रिटन कोविडमधून सावरला असला तरी तेथील शिक्षण क्षेत्रावर त्याचा गंभीर परिणाम झालेला दिसून येतो. आजघडीला पहिली ते पाचवीची २० टक्के मुले शाळेत गैरहजर राहात असल्याचे समोर आले आहे.
कोविडनंतर प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये गैरहजेरीचे प्रमाण ब्रिटनमध्ये लक्षणीयरित्या वाढले आहे. या शैक्षणिक वर्षात पहिली ते पाचवीतील मुले कमीत कमी २० टक्के अनुपस्थित राहात आहेत. हा दर कोविडपूर्वीच्या स्थितीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.
नॅशनल असोसिएशन ऑफ हेड टीचर्सचे पदाधिकारी रॉब विल्यम्स म्हणाले, ‘‘कोविडनंतर सर्व सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे होऊ शकले नाही. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा १५ टक्के अभ्यासक्रम शिकायचा राहिला, तर भविष्यात त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यांची १६ व्या वर्षी जीसीएसई परीक्षेत उत्तीर्ण होण्याची श्क्यता निम्म्याने होते.’’
खूप कमी हजेरीच्या विद्यार्थ्यांना पोलिसांसोबतच्या संकटात अडकण्याची शक्यता जास्त राहते. ब्रिटनच्या शाळांत १,४०,००० नोंदणीकृत विद्यार्थी आहेत. मात्र, त्यांची हजेरी कमीअसते. मुले शाळेत न जाण्याची अनेक कारणे आहेत. आई-वडील त्यांना ही सवलत देत आहेत. आर्थिक स्थितीही प्रमुख कारण आहे. सेंटर फॉर सोशल जस्टिसशी संबंधित बेथ प्रेस्कॉट म्हणाले, ‘‘शिक्षणाबाबत मुलांचा दृष्टीकोन बदलत आहे. कोविडपूर्वी मुलांना शाळेत जाणे आवश्यक वाटते होते. मात्र, दीर्घकाळ ऑनलाइन शिक्षण घेतल्यानंतर आता मुलांना शाळेत जाणे नकोसे वाटते.’’
कोविडनंतर मुले आणि त्यांच्या आई-वडिलांच्या मानसिक समस्या वाढल्या आहेत. एका सर्वेक्षणानुसार, ७ ते १६ वर्षे वयातील सहापैकी एका मुलाला मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. कोविडपूर्वी हे प्रमाण नऊ मुलांपैकी एक असे होते. त्यात आता दीडपटीने वाढ झालेली दिसून येते.
वृत्तसंस्था