किसान आंदोलनाच्या वेळी सरकारने धमकावले
#न्यूयॉर्क
ट्विटरचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्सी यांनी मोदी सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरला धमकावले होते, असा गंभीर आरोप केला आहे. याशिवाय मोदी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांची ट्विटर अकाऊंट बंद करा. आम्ही असे केले नाही तर भारतात ट्विटर बंद करू आणि कर्मचाऱ्यांच्या घरी छापेमारी करू, अशी धमकीही आम्हाला देण्यात आली होती, असा दावा जॅक डोर्सी यांनी सोमवारी (१२ जून) 'ब्रेकिंग पॉईंट' या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
या मुलाखतीत जॅक डोर्सींना शक्तिशाली लोकांविषयी प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी त्यांनी भारताचे नाव घेतले नाही, पण या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, शेतकरी आंदोलनादरम्यान आम्हाला धमक्या देण्यात आल्या होत्या. जगभरातले अनेक शक्तिशाली लोक तुमच्याकडे येतात. विविध प्रकारच्या मागण्या करतात. भारतात जेव्हा किसान आंदोलन सुरू होते तेव्हा आमच्याकडे बऱ्याच मागण्या आल्या. काही पत्रकार हे सरकारवर टीका करत होते. त्यांच्या विषयीच्या या मागण्या होत्या. एक प्रकारे आम्हाला हा इशाराच दिला गेला की, आमचे ऐकले नाही तर भारतात ट्विटर बंद करू. भारत ही ट्विटरसाठी मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव काही निर्णय घ्यावे लागले. तसे केले नसते तर आमची कार्यालये बंद करण्यात आली असती, याशिवाय कर्मचाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली असती. हे भारतात घडले आहे, जो एक लोकशाही देश आहे, असेही डोर्सी यांनी म्हटले आहे. प्रशांत भूषण यांनी हा व्हीडीओ ट्वीट केला आहे.
एलॉन मस्क यांच्यावर फोडले खापर
ट्विटरचे मालक आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांचे धोरण निष्काळजी असल्याचा आरोप डोर्सी यांनी केला आहे. एलॉन मस्क हे आमचे क्रमांक एकचे यूजर होते आणि ते चांगले ग्राहकही होते. ट्विटर खरेदी केल्यावर त्यांनी लवचिक धोरण स्वीकारले असल्याचे डोर्सी म्हणाले आहेत.