देशांतर्गत उत्पादन घटल्याने जपान, ब्रिटन मंदीच्या गर्तेत
जपानची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर गेली आहे.
आता जर्मनी जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. जपानची अर्थव्यवस्था सुमारे ४.३ लाख कोटी डॉलरची आहे. जपानचा ‘जीडीपी’ डिसेंबर २०२३ ला संपलेल्या तिमाहीत ०.४ टक्क्यांवर आला. त्याआधीच्या ऑक्टोबर तिमाहीत ३.३ टक्क्यांनी घसरला होता. कमकुवत चलन, घटती लोकसंख्या अशा समस्यांमुळे जपानच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होत आहे.
यापूर्वी २०१० मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमुळे जपान दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला होता. सध्या अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
ब्रिटनच्या सांख्यिकी विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशाचा ‘जीडीपी’ डिसेंबर २०२३ या तिमाहीदरम्यान ०.३ टक्के व सप्टेंबर तिमाहीत ०.१ टक्क्यांनी घसरला. डिसेंबर तिमाहीत बांधकाम, उत्पादनासह सर्व मुख्य क्षेत्रांमध्ये मंदी होती. जानेवारीमध्ये बँक ऑफ इंग्लंडने ब्रिटनमधील महागाई दर दोन टक्के इतपत आटोक्यात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, सध्या हा महागाई दर लक्ष्याच्या दुप्पट म्हणजे चार टक्के आहे. महागाईला आळा घालण्यासाठी मध्यवर्ती बँकेने गेल्या वर्षी ऑगस्टपासून व्याजदर ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवले आहेत.वृत्तसंंस्था