युक्रेनकडून रशियावर ड्रोन हल्ले सुरूच
#मॉस्को
युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या विविध भागांमध्ये ड्रोन हल्ले केल्याचा दावा रशियाने केला. यापैकी काही हल्ले मॉस्कोपासून शंभर किलोमीटर अंतरापर्यंत झाल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून सीमेवरील संरक्षण वाढविण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच अमेरिका, युरोपियन युनियनच्या मदतीमुळेच युक्रेनची आक्रमक क्षमता वाढली असल्याचा आरोप रशियाने केला आहे. या हल्ल्याचे जशास तसे प्रत्युत्तर देणार असल्याचेही रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे जीवितहानी झाली नसून इतरही नुकसान झालेले नाही. मात्र, यामुळे रशियाच्या संरक्षण क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. युक्रेनने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरी रशियाने मात्र आरोप ठेवले आहेत. युक्रेनच्या ड्रोनमुळे रशियाच्या दक्षिण व पश्चिम भागात हल्ले केल्याचा आरोप आहे. यातील बहुतेक भाग सीमेपासून जवळच असला तरी काही ड्रोन मॉस्कोपासून शंभर किलोमीटरवर पडले. युक्रेनच्या पूर्व भागात असलेल्या बाख्मुत भागात रशियाने गुरुवारी जोरदार हल्ले केले. बाख्मुत भागात रशियाने केलेल्या हल्ल्यांमुळे हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. येथील लोकांच्या जिवाची रशियाला अजिबात फिकीर नसल्यानेच ते वारंवार येथे हल्ले करत आहेत, अशी टीका युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केली आहे.