आर्थिक सामर्थ्याचा दुरूपयोग नको
#हिरोशिमा
जपानमधील हिरोशिमा येथे 'क्वाड' देशांच्या बैठकीत अप्रत्यक्षपणे चीनला लक्ष्य करण्यात आले. जागतिक शांतता, आर्थिक स्थैर्याऐवजी आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव निर्माण करणाऱ्या देशांवर टीका करताना या चारही देशांनी नामोल्लेख टाळत चीनवर निशाणा साधला आहे.
हिरोशिमा येथे चार देशांचा गट असलेल्या 'क्वाड'च्या वार्षिक शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक समस्यांवर चर्चा केली. या दरम्यान, क्वाड नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे चीनवर हल्ला केला आहे.
निवेदनात चीनचे नाव घेतलेले नाही, मात्र 'इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्य' या विषयावरील संयुक्त निवेदनात 'कम्युनिस्ट महासत्ता' असा चीनचा स्पष्ट उल्लेख आहे. भारतीय सीमेवर चीनकडून सातत्याने कुरघोडी केल्या जात आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेल्या या देशाने इतर अनेक गरीब देशांच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण केले आहे. चीनच्या या विस्तारवादी धोरणामुळे संबंधित भागात तणाव निर्माण झाला आहे.
काय आहे संयुक्त निवेदनात ?
आम्ही बळजबरीने किंवा जबरदस्ती करून भौगोलिक स्थिती बदलू पाहणाऱ्या अस्थिर किंवा एकतर्फी कृतींचा तीव्र विरोध करतो. वादग्रस्त भागातील लष्करीकरण, तटरक्षक आणि सागरी जहाजांचा धोकादायक वापर आणि इतर देशांच्या कर्तव्यांमध्ये व्यत्यय आणण्याच्या प्रयत्नांवर गंभीर चिंता व्यक्त करतो आहोत. इंडो-पॅसिफिक समुद्राखालील केबल नेटवर्कला पाठबळ देण्याची गरज आहे, जागतिक समृद्धी आणि प्रगतीसाठी हे महत्त्वाचे आहे. आपले आर्थिक सामर्थ्य वापरून कमकुवत देशांतील अस्थिरता निर्माण करणाऱ्या शक्तींचा आम्ही निषेध करत असल्याचेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
वृत्तसंस्था