कामाच्या ठिकाणी ‘अफेअर’ नको
#बीजिंग
प्रत्येक कार्यालयाचे व्यवस्थापन आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही नियम आखून देत असते. कर्मचाऱ्यांनी या नियमांचे पालन करावे, अशी व्यवस्थापनाची अपेक्षा असते. हे नियमही कार्यालयीन कामकाज, शिस्त याबाबत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही या नियमांचे पालन करण्यात काही वावगे वाटत नाही. मात्र कार्यालयात विवाहबाह्य संबंध ठेवण्यास मनाई करणारा नियम व्यवस्थापनाने काढल्यास त्याला काय म्हणता येईल? चीनमध्ये एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असा एक विचित्र नियम लागू केला आहे.
कार्यालयात विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे या कंपनीने म्हटले आहे. कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता वाढावी, त्यांचा उत्साह वाढावा, गुणवत्तेत वाढ व्हावी आणि आणि आपल्या कुटुंबाप्रती ते अधिक प्रामाणिक असावेत या उद्देशाने हा नियम लागू करण्यात आल्याचे कारण कंपनीने दिले आहे. चीनच्या झेजँग प्रांतातील ही कंपनी आहे. या कंपनीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
या कंपनीने आपल्या सर्व विवाहित कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू केला आहे. ९ जून रोजी याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. अंतर्गत व्यवस्थापन सुधारण्यासाठी वैवाहिक जीवनातील प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देण्यासाठी, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणि कर्मचाऱ्यांचे कामावर अधिक लक्ष राहावे यासाठी हा निर्णय घेतल्याचा खुलासा कंपनीने केला आहे. या आदेशानुसार एखादा विवाहित कर्मचारी कार्यालयात प्रेमसंबंध ठेवताना आढळून आला, तर त्याला कामावरून काढण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने चार कारणे दिली आहेत. यात अवैध संबंध, मिस्ट्रेस, विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोट या सर्व गोष्टींसाठी मनाई करण्यात आली आहे.
हा तर खासगी आयुष्यात हस्तक्षेप!
चीनमधील कायदेतज्ज्ञांनी मात्र कंपनीचा हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या खासगी आयुष्यातील हस्तक्षेप ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कंपनीला हा निर्णय लागू करण्यासाठी कायदेशीर अडचण येऊ शकते. कारण चीनमधील कामगार कायद्यानुसार, एखादी कंपनी कामगारांना तेव्हाच कामावरून काढू शकते, जेव्हा तो नेमून दिलेले काम करत नाही, किंवा करण्यास पात्र राहात नाही. त्यामुळे विवाहबाह्य संबंध हे कर्मचाऱ्यांना काढण्याचे कारण असूच शकत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा येऊ शकते. एखादा कर्मचारी त्याचे नेमून दिलेले काम व्यवस्थितरीत्या करत असते आणि कार्यालयातील मैत्रिणीसोबत त्याचे प्रेमसंबंध असतील तर त्याच्यावर कारवाई कशी काय करता येऊ शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कंपनीच्या या निर्णयाची चीनमधील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही लोक कंपनी कर्मचाऱ्यांच्या घरच्यांचा देखील विचार करत असल्याचे म्हणत या निर्णयाचे स्वागत करत आहेत, तर दुसरीकडे ही कर्मचाऱ्यांची खासगी बाब असल्याचे सांगत काही लोकांनी याला विरोध दर्शवला आहे.
वृत्तसंस्था