डीएनए चाचणीमुळे संसाराची धूळदाण
#न्यूयॉर्क
एखाद्याची जैविक ओळख काय याचा शोध घ्यायचा असेल तर डीएनए चाचणी केली जाते. मात्र याच चाचणीमुळे एका व्यक्तीचा संसार धुळीस मिळाला आहे. एका व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील एक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
या व्यक्तीच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र एका डीएनए चाचणीमुळे त्याच्या सुखी संसाराची राखरांगोळी झाली आहे. ज्या पत्नीवर त्याचे जीवापाड प्रेम होते, तिचे तोंडही बघण्याची त्याची इच्छा राहिलेली नाही. संबंधित व्यक्तीस जुळी मुले आहेत. एक पत्नी, दोन गोंडस मुले असे सगळे मजेत जात असताना डीएनए चाचणीमुळे त्याला नको ते सत्य समजले आणि आता तो निराश झाला आहे. त्याला अलीकडेच तो या मुलांचा जैविक बाप नसल्याचे कळले.
नेमके काय घडले?
हे कळल्यानंतर जेव्हा त्याने त्याच्या पत्नीला जाब विचारला, तेव्हा तिच्याकडून मिळालेल्या उत्तराने तो हैराण झाला. हे दोघे पती-पत्नी एकमेकांना वीस वर्षांपासून ओळखतात. यांनी सोबतच एक छोटासा बिझनेस सुरू केला होता. यांच्या लग्नाला आता अठरा वर्षे झाली आहेत. त्यांनी स्वत:ची कंपनी उघडल्यानंतर एका वर्षाने लग्न केले. मात्र लग्नाच्या दोन महिन्यांनंतर त्या दोघांत भांडण झाले आणि ती घरून निघून गेली. दोन आठवड्यांनी ती परत आली. दोघांचे भांडणसुद्धा मिटले. याचदरम्यान ती गर्भवती असल्याचे कळले. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. पती-पत्नीचा पुढे सुखी संसार सुरू होता. त्यांच्या जीवनात बरेच चढ-उतार आले. मात्र दोघांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. मात्र डीएनए अहवालाने पतीचा विश्वासच उडाला. त्याला कळले की तो या मुलांचा जैविक बाप नाही.
वृत्तसंस्था