ऑनलाईन बैठकीत नगरसेवकाची फजिती
#रोमानिया
कोरोनामुळे जगाला घरी बसून काम करण्याची म्हणजेच 'वर्क फ्रॉम होम'ची संकल्पना समजली. कार्यालयात जाण्या-येण्याचा खर्च आणि वेळ वाचत असल्याने जगभर या संकल्पनेचे स्वागत करण्यात आले. मात्र या संकल्पनेचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. नगराध्यक्षांनी अचानक बोलावलेल्या ऑनलाईन बैठकीत एका नगरसेवकाची फजिती झाल्यामुळे घरी बसून कार्यालयातील काम करणे वाटते तेवढे सोपे नसल्याचे समोर आले आहे.
रोमानियातील एका नगरसेवकांना याचा प्रत्यय आला आहे. घरात असताना नगराध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत या महोदयांनी हजेरी लावली खरी, मात्र त्यांच्या या हजेरीमुळे त्यांच्यावर मान खाली घालण्याची वेळ आली. त्याचे झाले असे की नगराध्यक्षांनी अचानकपणे कुठल्यातरी विषयावर बैठक बोलावली. सगळे सदस्य ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले. नगरसेवक अल्बर्टो-इओसिफ कैरियनही असेच ऑनलाईन सहभागी झाले. त्यानंतर त्यांचे जे हसे झाले त्यामुळे त्यांना शरमेने मान खाली घालावी लागली. नगराध्यक्षांच्या कार्यालयाने फोनवरून निरोप दिला त्यावेळी ते आंघोळ करत होते. ऑनलाईन बैठक आहे, ती केवळ ऐकण्या-बोलण्यापुरती सीमित असल्याचा विचार करून ते सहभागी झाले. नंतर सांगितले गेले कॅमेरा ऑन करा. त्यांनी कॅमेरा ऑन केला. मात्र त्यावेळी त्यांनी केवळ टॉवेल गुंडाळला होता. त्याच अवतारात ते नगराध्यक्षांसह सगळ्यांना दिसले. त्यामुळे संतापलेल्या नगराध्यक्षांनी कॅमेरा बंद करण्याचे आदेश दिले.
कॅमेरा बंद करण्याचे भानही उरले नाही
दरम्यान या फजितीमुळे अल्बर्टो एवढे गोधळून गेले की त्यांना कॅमेरा बंद करता येईना. ते कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो बंद होत नव्हता. त्याचवेळी ते आपल्याला कॅमेरा बंद करता येत नाही, आपल्याला कॉल बंद करता येत नसल्याचे विनवत होते. त्यांची ही कसरत पाहून नगराध्यक्षबाई आणि इतर नगरसेवकही जोरजोरात हसायला लागले आणि अल्बर्टो यांना मेल्याहून मेल्यासारखे झाले. त्यानंतर कसाबसा कॉल कट झाला. अल्बर्टो यांनी कपडे घातले आणि पुन्हा सभेत सहभागी झाले.
फेसबुकवर पोस्ट टाकून या प्रकाराबद्दल रीतसर माफी मागितली.
वृत्तसंंस्था