सुदानमध्ये लष्कर, निमलष्करी दलात संघर्ष
#खार्टूम
सुदानमध्ये लष्करी दलाचे जवान आणि निमलष्करी दलाच्या जवानांची परस्परांत जुंपली असून तुफान गोळीबार सुरू झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने सुदानमधील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय दूतावासाने ट्विट करत भारतीयांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.
उत्तर आफ्रिका खंडातील सुदान हा सर्वात मोठा अरब देश आहे. या देशाची राजधानी खार्टूम इथे लष्करी दल आणि निमलष्करी दलाच्या (रॅपिड सपोर्ट फोर्स) जवानांमध्ये झटापट झाली. त्यानंतर दोन्ही गटांकडून तुफान गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय नागरिकांनी आपल्या घराबाहेर पडू नये, घरातच राहावे, पुढील सल्ला मिळेपर्यंत वास्तव्याचे ठिकाण सोडू नये, असा सल्ला भारतीय दूतावासाने दिला आहे.
सुदानची राजधानी खार्टूममध्ये लष्कर आणि अर्धसैनिक दलाच्या जवानांमध्ये झटापट पाहायला मिळाली. यानंतर दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबारही झाला. स्थानिक लोकांनी हा गोळीबाराचा प्रकार अनुभवला. सुदानचे लष्करी मुख्यालय आणि मध्यवर्ती खार्टूममधील संरक्षण मंत्रालयाच्या जवळपासदेखील गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सुदानमध्ये अशाच प्रकारे निमलष्करी दल आणि लष्करी जवानांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव पाहायला मिळाला होता. निमलष्करी दलाने विमानतळावर ताबा मिळवला असल्याचा दावा केला आहे. सुदानच्या लष्करी दलाने निमलष्करी दलाच्या
निवासी स्थानांवर हल्ला केला असल्याचे सांगण्यात आले. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रॅपिड सपोर्ट फोर्सच्या जवानांनी लष्करी दलाच्या अनेक निवासी स्थानांवर हल्ला केला, त्यामुळे निमलष्करी दलाच्या निवासी स्थानांवर प्रतिहल्ला करण्यात आला. दरम्यान दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू आहे.
वृत्तसंस्था