तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा
#वॉशिंग्टन
मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी वंशाचा कॅनडास्थित व्यापारी तहव्वूर राणाचा सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केला होता. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कारवाईसाठी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अमेरिकेत मागणी केली. त्यावर कॅलिफोर्नियाच्या न्यायालयाने बुधवारी (१७ मे) तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात १६६ लोकांनी प्राण गमावले होते. तब्बल ६० तास मुंबई धुमसत होती. यावेळी मुंबई पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत १० पाकिस्तानी दहशवाद्यांना कंठस्नान घातले होते. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. दरम्यान या प्रकरणात तहव्वूर राणाचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणााठी भारताने अमेरिकेत विनंती केली. या विनंतीला बायडन सरकारनेही पाठिंबा दिला होता. १० जून २०२० रोजी भारताने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. भारताने केलेल्या विनंतीच्या समर्थनार्थ आणि विरोधात सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे पुनरावलोकन आम्ही केले आहे. तसेच सुनावणीदरम्यान पुराव्यादाखल सादर केलेल्या कागदपत्रांचा विचार केल्याचे न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी आपल्या ४८ पानांच्या आदेशात म्हटले आहे.
कोण आहे तहव्वूर राणा?
तहव्वूर राणा हा कुख्यात दहशतवादी डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र आहे. त्याचा जन्म पाकिस्तानात झाला होता. हेडली आणि राणा पाकिस्तानातील हसन अब्दुल कॅडेट स्कूलमध्ये एकत्र होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राणाने पाकिस्तानी लष्करात डॉक्टर म्हणून काम केले. त्यानंतर तहव्वूर राणाने कॅनडात स्थलांतर केले. काही वर्ष कॅनडामध्ये राहिल्यानंतर त्याने तिथले नागरिकत्व मिळवले. यानंतर अमेरिकेत त्याने 'फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन' नावाची एक व्यावसायिक संस्था सुरू केली. शिकागो शहरात त्याचे मुख्यालय होते. याच कंपनीची एक शाखा पुढे मुंबईमध्येही सुरू करण्यात आली. पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन डेव्हिड कोलमन हेडली हा लष्कर-ए -तोयबामध्ये सामील होता. तहव्वूर राणाने त्याला अप्रत्यक्ष मदत केली होती. हेडलीच्या कारवायांना संरक्षण देण्याचे काम राणाने केले होते. दहशतवादी कृत्याच्या कटाचा भाग म्हणून राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारताने विनंती केली. परंतु, राणाच्या प्रत्यार्पणाला राणाच्या वकिलांनी विरोध केला होता.
सरकारी वकिलांच्या युक्तिवादाला यश
अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, राणाला हेडलीच्या कामाची माहिती होती. तरीही त्याने हेडलीला पाठीशी घातले. सोबतच दहशतवादी कारवायांसाठी त्याची मदत केली. या हल्ल्याचे नियोजन, टार्गेट असलेल्या जागा, हेडलीच्या बैठका यांबाबतही राणाला माहिती असल्याचा दावा अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी युक्तिवादात केला आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी, भारताने त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. राणावर अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यांखाली अमेरिकेत कार्यवाही केली जाते आहे. युद्ध पुकारणे, हत्या करणे, फसवणूक करणे, दहशतवादी कृत्य करणे, दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणे आदी विविध गुन्हे तहव्वूर राणावर लावण्यात आले असल्याचे म्हटले आहे.