चंद्रावर उभे राहते आहे चीनचे टुमदार घर !
#बीजिंग
आजचे युग हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक देशांनी फार मोठी झेप घेतली आणि विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाच्या बदलांचा वेगही प्रचंड आहे. याच तंत्रज्ञानाच्या जोरावर काही देश पृथ्वीवरच नव्हे तर चंद्रावरही राहण्याचा विचार करत आहेत. चीन २०३० पर्यंत चंद्रावर माणसे पाठवणार आहे. एवढेच नव्हे तर चंद्रावर घरेही बांधण्याचा चीनचा मनसुबा आहे.
या दिशेने चीनच्या संशोधकांनी वेगाने काम सुरू केले आहे. यासाठी चीनकडून अनेक मोहिमांवर काम केले जाणार आहे. चीनला काहीही करून २०३० पर्यंत चंद्रावर माणसाचे वास्तव्य असायला हवे, हे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. या मोहिमेवर अमेरिका आधीपासूनच काम करत आहे. आता या रांगेत चीनचा समावेश झाला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून चीन चंद्रावर घरे बांधणार असून त्यासाठी थ्री-डी प्रींटिंग तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. यासाठी 'रोबोटिक मेसन'च्या माध्यमातून मातीच्या विटा बनवण्याच्या योजनेवर चीन काम करत आहे. यासाठी चंद्रावरील उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर चीनचा भर असेल.
चीनची चंद्रमोहीम अनेक टप्प्यातून जाणार आहे. यासाठी चीनने चांग ई-६ , चांग ई-७ आणि चांग ई-८ असे टप्पे ठरवले आहेत. ही मोहीम २०३० पर्यंत राबवण्यात येणार आहे. यातील चांग ई-८ ही मोहीम निर्णायक ठरणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर जाऊन माणसं राहू शकतील का? माणसासाठी अनुकूल वातावरण आहे का? आणि तेथील जमिनीखाली खनिजे आहेत का? याची माहिती गोळा केली जाणार आहे.
याशिवाय चंद्रावर दीर्घकाळ राहण्यासाठी काही स्पेस स्टेशन उभारण्याचाही चीनचा विचार आहे. त्यासाठी तेथील वातावरणाचा अभ्यास सुरू आहे. चंद्रावर काही काही ठिकाणी असे खड्डे आहेत जिथे पृथ्वीसारखे वातावरण असून तिथे माणूस राहू शकतो. चंद्रावर दिवसा तापमान २८० अंश असते तर रात्री उणे २५० अंश असते. यापूर्वीही अनेकदा चंद्रावर माणूस राहू शकतो, अशा प्रकारच्या बातम्या आल्या आहेत. या दिशेने अजून संशोधक अभ्यास करत आहेत. त्यामुळे भविष्यात चंद्रावर माणूस राहू शकेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान चीनने २०२० मध्ये एक चंद्रयान मोहीम राबवली होती. चांग ई- ५ या मोहिमेच्या माध्यमातून सर्वप्रथम चंद्रावरून परीक्षणासाठी माती आणली होती. यापूर्वी चीनने २०१३ मध्ये चंद्रावर यान उतरवले होते. हे यान मानवविरहित होते.
वृत्तसंस्था