China - America : दूरसंचार क्षेत्रात चीन अमेरिकेच्या एक पाऊल पुढे

शस्त्रास्त्र संपन्नता असो की, अवकाश संशोधन क्षेत्र, प्रत्येक ठिकाणी अमेरिकेवर मात करण्यासाठी चीनची धडपड सुरू असते. दूरसंचार क्षेत्रातही चीनने अमेरिकेपेक्षा एक पाऊल पुढे टाकत लवकरच ६-जी वायरलेस नेटवर्क वापरात आणण्याचे संकेत दिले आहेत. चीन अल्ट्रा फास्ट वायरलेस इंटरनेटचे टेस्टिंगदेखील करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 26 Apr 2023
  • 01:36 pm
दूरसंचार क्षेत्रात चीन अमेरिकेच्या एक पाऊल पुढे

दूरसंचार क्षेत्रात चीन अमेरिकेच्या एक पाऊल पुढे

बहुतांश देशात ५-जी च्या चर्चा सुरू असताना चीनमध्ये होणार ६-जी चा वापर; स्पर्धेत मागे पडल्याने अमेरिकेचे टेन्शन वाढले

#बीजिंग

शस्त्रास्त्र संपन्नता असो की, अवकाश संशोधन क्षेत्र, प्रत्येक ठिकाणी अमेरिकेवर मात करण्यासाठी चीनची धडपड सुरू असते. दूरसंचार क्षेत्रातही चीनने अमेरिकेपेक्षा एक पाऊल पुढे टाकत लवकरच ६-जी वायरलेस नेटवर्क वापरात आणण्याचे संकेत दिले आहेत. चीन अल्ट्रा फास्ट वायरलेस इंटरनेटचे टेस्टिंगदेखील करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्याचा स्पीड १०० जीबीपीएस एवढा आहे. असे झाल्यास हे नेटवर्क ५-जी पेक्षा कितीतरी पटीने वेगवान असणार आहे. पण हे सगळे चीनने आपल्या आधी केले असल्यामुळे अमेरिकेची अस्वस्थता वाढली आहे.

संपूर्ण जगभरामध्ये आता ५-जी नेटवर्कची चर्चा सुरू आहे. जगातील अनेक देशांमध्ये ५-जी नेटवर्क सुरू करण्यात आले आहे. भारतातसुद्धा रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांनी अनेक शहरांमध्ये आपली ५-जी सेवा सुरू केली आहे, तर चीन लवकरच या पुढचा टप्पा असलेली ६-जी नेटवर्क ही सेवा वापरात आणण्याची चर्चा रंगली आहे. चीनमधील संशोधक ६-जी वर काम करत आहेत. ४-जी नेटवर्कपेक्षा ५-जी नेटवर्क २० पटींनी वेगवान आहे. मात्र ६-जी लॉन्च झाल्यास हे सर्व विक्रम मोडीत निघणार आहेत.

६-जी वायरलेस इंटरनेट हे स्पीड, स्पेक्ट्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सुरक्षा आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत लाभदायक ठरणार आहे. सध्या अनेक देशांमध्ये ५-जी सुरू झाले असले तरी बरेच देश ५-जी नेटवर्कच्या प्रत्यक्ष वापरासाठी संघर्ष करत आहेत. भारतातही अजून ५-जी सेवा पोहोचलेली नाही. ६-जी नेटवर्क पहिल्यांदा कोण सुरू करणार याची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये आपण मागे राहू की काय अशी भीती अमेरिकेला वाटत आहे.

मागच्या आठवड्यात व्हाईट हाऊसने वायरलेस कनेक्टिव्हिटीच्या या पुढच्या टप्प्यावर चर्चा करण्यासाठी उद्योग क्षेत्रामधील नेत्यांची चर्चा आयोजित केली होती. इतर देश हे ६-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या स्टॅंडर्डमध्ये आघाडीवर असतील आणि आपण मागे राहू अशी भीती अमेरिकेला सतावत आहे. अमेरिकेला सर्वात जास्त चिंता ही चीनची आहे. थोडक्यात चीनने जर खरोखरच ६- जी नेटवर्क सुरू केले तर अमेरिकेची चिंता वाढणार आहे.

चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्रीच्या दुसऱ्या अकॅडमीच्या २५ व्या शाखेने प्रथमच टेरा हर्ट्झ (टीएचझेड) वारंवारिता स्तरावर यशस्वी वायरलेस ट्रान्समिशनचा अहवाल दिला आहे, ज्याने १०० जीबीपीएस डेटा स्पीड मिळवला आहे. म्हणजेच अमेरिकेत १ जीबीपीएसवर चालणार्‍या ५-जी  सिग्नलपेक्षा ते वेगवान आहे. अमेरिकेच्या सरकारने ६-जी संशोधनासाठी १ अब्ज डॉलरचा निधी मंजूर केला आहे. मात्र या निधीत चीनला मागे टाकता येईल की नाही, अशी शंका अमेरिकेचे संशोधक व्यक्त करत आहेत.

कसे असेल ६-जी तंत्रज्ञान?

ही टेक्नॉलॉजी टेरा हर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा वापर करते. जे ५-जी साठी एमएमवेव्ह बँड्सप्रमाणे, सिग्नल अंतर आणि क्लाउड/फॉगमध्ये आव्हाने सादर करते. तथापि, टेरा हर्ट्झच्या मदतीने वायरलेस संचार जवळच्या अंतरावर तसेच दूरवरून फायबरवर प्रसारित करू शकते. अमेरिकेवर कुरघोडी करायची म्हणून चीनने दूरसंचार क्षेत्रातील संशोधनावर कितीही भर दिला तरीही ६-जी नेटवर्क २०३० पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता नसल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest