तंत्रज्ञान विकासात चीन महासत्तेला भारी
#लंडन
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाचा विषय निघाला की सगळ्यांच्याच मुखात अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांचे नाव असते. मात्र अलीकडील काही वर्षात या क्षेत्रात एका आशियाई देशाने असा काही पल्ला गाठला आहे की, अमेरिकेलाही मागे टाकले आहे. कृषी, तंत्रज्ञान,आण्विक संशोधन, अवकाश संशोधन या आणि इतर अनेक क्षेत्रात चीनने नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
'ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट' या लंडनस्थित थिंक टँकने प्रकाशित केलेल्या एका अहवालात याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 'क्रिटिकल टेक ट्रॅकर' या शीर्षकाखाली प्रकाशित अहवालानुसार काही क्षेत्रात तर चीनने अमेरिकेवरही मात केली आहे. तंत्रज्ञान, संरक्षण, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात सध्या चीनने अमेरिकेवर मात केली आहे. यात इलेक्ट्रिक बॅटरी हायपरसॉनिक्स, ५- जी आणि ६-जी सारख्या अद्ययावत रेडिओ फ्रिक्वेन्सीचाही समावेश आहे. प्रत्येक क्षेत्रात अमेरिकेशी टक्कर देण्याच्या हेतूने चीनने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत संशोधनाला नेहमीच प्राधान्य दिले आहे.
टीके, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि स्पेस लाँच सीस्टिमसारख्या सात क्षेत्रात एकेकाळी अमेरिकेची एकाधिकारशाही होती. अन्य कुठल्याच देशांकडे अमेरिकेएवढे प्रगत तंत्रज्ञान नव्हते. चीनने याही क्षेत्रात शिरकाव करत आपल्या तंत्रज्ञांना, संशोधकांना प्रोत्साहन देऊन अमेरिकेशी स्पर्धा करायला सुरुवात केली आणि आज अमेरिकेखालोखाल या सात क्षेत्रात चीनचा क्रमांक लागतो.
बहुतांश क्षेत्रात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमाकांवर
चायनीज अकॅडेमी ऑफ सायन्स या संस्थेच्या माध्यमातून ४४ प्रकारच्या तंत्रज्ञान आयुधांमध्ये चीन पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनला या क्षेत्रातही अमेरिकेवर मात करायची आहे. ज्या-ज्या क्षेत्रात आपले संशोधक कमी पडतात, त्या प्रत्येक क्षेत्रातील अद्ययावत प्रक्रियात्मक ज्ञान संपादन करून प्रसंगी त्यासाठी भागीदारी करून चीन आपला कार्यभाग साधत असते. आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि धोरणात्मक प्रभावाच्या जोरावर आजवर जगभरात हस्तक्षेप करणाऱ्या अमेरिकेसमोर चीनच्या रूपात कडवा प्रतिस्पर्धी उभा राहिला आहे, त्यामुळेच अमेरिका चीनवर आरोप करत असते.