अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीनचा दबदबा
#स्टॉकहोम
रशिया- युक्रेन युद्धाचे परिणाम सर्व जगावर पडले आहे. या दोन देशांसह जगभरात भू-राजनैतिक तणाव वाढला आहे. गेल्या वर्षी अनेक देशांच्या विशेष करून चीनच्या अण्वस्त्रांमध्ये वाढ झाली आहे. तसेच इतर अण्वस्त्रधारी देशही आपापल्या क्षमतेनुसार त्यांच्या आण्विक शस्त्रास्त्रांमध्ये वाढ आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अण्वस्त्रांची संख्या वाढवण्याचा चीनचा झपाटा ही अमेरिकेच्यादृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे.
'स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट' अर्थात अण्वस्त्रांवर लक्ष ठेऊन असणाऱ्या (एसआयपीआरआय) संस्थेच्या ताज्या अहवालाने जगाला पुन्हा एकदा चिंतेत टाकले आहे. अहवालानुसार चीन आपली अणुशक्ती वेगाने वाढवत असून येत्या दशकभरात चीन अण्वस्त्रांच्या संख्येत रशिया आणि अमेरिकेशी स्पर्धा करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विविध देशांत वापरण्यासाठी उपलब्ध शस्त्रास्त्रे आणि त्यांचा एकूण साठा यांचा आढावा या संस्थेकडून घेतला जातो. एकूण शस्त्रसाठ्यात जुन्या शस्त्रांचीही मोजणी केली जाते, जी नष्ट करण्यात येणार आहेत किंवा केली जाणार आहेत. जगातील नऊ अण्वस्त्रधारी देशांमधील अण्वस्त्रांची संख्या गेल्या वर्षापेक्षा यंदा कमी झाली असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
ब्रिटन, चीन, फ्रान्स, भारत, इस्राईल, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया आणि अमेरिकेतील अण्वस्त्रांच्या संख्येत यंदा घट झाली आहे. जगातील नऊ देशांकडे २०२२ च्या सुरुवातीला १५ हजार ७१० अण्वस्त्रे होती. २०२३ च्या प्रारंभी हा आकडा १२ हजार ५१२ वर आला आहे. या अण्वस्त्रांमधील नऊ हजार ५७६ ‘शस्त्रे संभाव्य वापरासाठी लष्करी साठ्यात ठेवली होती. या साठ्यातील शस्त्रांची संख्या गेल्या वर्षापेक्षा यंदा ८६ ने वाढली आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आण्विक शस्त्रांचे नियंत्रण आणि निशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेने रशियाबरोबर सुरू असलेली द्विपक्षीय धोरणात्मक स्थैर्याची चर्चा थांबवली आहे. ही चर्चा म्हणजे अण्वस्त्र नियंत्रणाच्या माध्यमातून रशिया आणि अमेरिकेच्या सामरिक अण्वस्त्र शक्तीवर निर्बंध घालण्याची ती शेवटची संधी होती, अशी प्रतिक्रिया एसआयपीआरआयचे संचालक डॅन स्मिथ यांनी व्यक्त केली आहे.
अशी आहे अमेरिका आणि रशियाची स्थिती
जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी ९० टक्के अण्वस्त्र अमेरिका व रशियाकडे आहेत. रशियाकडे चार हजार ४८९ एवढा अण्वस्त्रसाठा आहे. ही संख्या आधी चार हजार ४७७ होती. या यादीत अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे. अमेरिकेकडे तीन हजार ७०८ आण्विक शस्त्रे आहेत. या दोन्ही देशांनी सुमारे दोन हजार अण्वस्त्रे ‘हाय अलर्ट’वर म्हणजे तातडीने वापर करण्यासाठी ठेवली आहेत . यातील बहुतांश शस्त्रे क्षेपणास्त्रांमध्ये किंवा तळावर तैनात आहेत.