‘अध्यक्षपदाची उमेदवारी ज्यो बायडेन यांनी सोडावी’
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपली उमेदवारी सोडावी अशी जाहीर मागणी डेमोक्रॅटिक पक्षाचे टेक्सासचे खासदार लॉयड डॉगेट यांनी केली आहे. अशी मागणी जाहीरपणे करणारे डॉगेट हे पक्षाचे पहिले नेते आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या अध्यक्षीय चर्चेतील ज्यो बायडेन यांच्या निस्तेज कामगिरीने पक्षात खळबळ माजली असून अनेकजण बायडेन यांनी उमेदवारी सोडावी अशी मागणी खासगीत करत आहेत. त्यातच एक पत्रकार आणि ट्रम्प समर्थक टकर कार्लसन यांनी असा दावा केला आहे की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना स्मृतिभ्रंश आहे. डेमोक्रॅट लवकरच बायडेन यांच्या जागी कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या उमेदवार बनवू शकतात, असेही ते म्हणाले. ( Joe Biden)
२८ जून रोजी अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय चर्चेवेळी बायडेन अनेक वेळा अडखळत बोलताना आणि सुस्तावलेले दिसले होते. विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांच्या विरोधातील चर्चेत त्यांचा पराभव झाला, तेव्हापासून त्यांच्या वय आणि क्षमतेवर पक्षात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका सर्वेक्षणानुसार, पक्षाच्या प्रत्येक ३ पैकी १ नेत्याचा असा विश्वास आहे की, या आठवड्यात बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीतून आपले नाव मागे घ्यावे. ‘सीएनएन’ च्या वृत्तानुसार, चर्चेनंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांना असे वाटत आहे की बायडेन पक्षाला निवडणूक जिंकून देऊ शकत नाहीत. त्यामुळे बायडेन विरोधात पक्षात आवाज उठत आहे. या पार्श्वभूमीवर बायडेन पक्षाचे खासदार, राज्यपालांचीही भेट घेणार आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांचे असे म्हणणे आहे की, बायडेन हे खूप हट्टी आहेत. त्यांना स्वतःची चूक समजावी म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांना सध्या एकटे सोडले आहे. हा केवळ वादाचा मुद्दा असता तर आपण या स्थितीतून बाहेर पडू शकलो असतो. त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या इतरही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. इलिनॉय राज्याचे खासदार माईक किगले म्हणाले की, बायडेन यांच्या निर्णयामुळे केवळ सिनेटमध्ये कोणाला स्थान मिळणार हेच ठरणार नाही तर पुढील ४ वर्षांचे व्हाईट हाऊस आणि देशाचे भवितव्य ठरणार आहे.
पत्रकार टकर कार्लसन यांनी आरोप केला आहे की, प्रसारमाध्यमे बायडेन यांचा स्मृतिभ्रंश लपवत आहेत.मी खात्रीने सांगू शकतो की जो बायडेन यांचे मानसिक संतुलन ठीक नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांना ही बाब माहीत आहे. बायडेन यांना दूर केले पाहिजे आणि ते नक्कीच तसे करतील. आता ते कधी करणार हा प्रश्न आहे. जर ते शहाणे असतील तर ते लवकरच निर्णय घेतील. कमला हॅरिस उमेदवार ठरल्या तर त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात.
कार्लसन म्हणतात की, माजी अध्यक्ष बराक ओबामा लोकांना सांगत आहेत की बायडेन जिंकू शकत नाहीत. ओबामा कोणाला पाठिंबा देत आहेत हे सांगत नाहीत. ओबामा आणि बायडेन यांचे संबंध कधीच चांगले राहिले नाहीत. एकेकाळी दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत होते.
आता ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे उमेदवारच नव्हे, तर संभाव्य अध्यक्ष म्हणून उदयास येत असल्याचा दावा कार्लसन यांनी केला आहे. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देऊन गप्प करण्याच्या ट्रम्पच्या विरोधातल्या मुद्द्यावर ते म्हणाले की बायडेन ट्रम्प यांना तुरुंगात टाकू इच्छित आहेत. हे अत्यंत गंभीर गुन्ह्यासाठी असले पाहिजे. तसे नसेल तर तुम्ही संपूर्ण व्यवस्था कायमची नष्ट कराल.
स्टेजवर झोप येत होती
अध्यक्षीय चर्चेतील आपल्या खराब कामगिरीबद्दल ज्यो बायडेन यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. चर्चेच्या काही दिवस आधी आपण अनेक देशांचा दौरा केल्याने सततच्या प्रवासामुळे चर्चेवेळी आपण थकलो होते. स्टेजवर ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना झोप येत असल्याचेही त्यांनी मान्य केले. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे ऐकले नाही आणि त्याच परिणाम आपणाला भोगावा लागत आहे.