कंबोडियाने केली कमाल
#नोम पेन्ह
कंबोडियाने शनिवारी स्वतःचाच सामूहिक नृत्याचा विक्रम मोडीत काढला आहे. कंबोडियात दरवर्षी 'मेडिसन' या समूहनृत्याने 'खमेर' म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. यंदा कंबोडियात ४९९९ नागरिकांनी सामूहिक नृत्य करत यापूर्वी गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे स्वतःच्या नावावर असणारा विक्रम मोडत नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
शनिवारी ४९९९ नागरिकांनी सीएम रीप प्रांतातील अंगकोर पुरातत्त्व पार्कमध्ये पाच मिनिटे मेडिसन नृत्य केले. मेडिसन हा कंबोडियातील पारंपरिक नृत्य प्रकार आहे. लग्नसमारंभ आणि नववर्षानिमित्त हा हमखास केला जातो. शनिवारी पंतप्रधान हुन सेन यांचा मुलगा हुन मेनी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांनी मेडिसन सादर केले. २०१५ साली कंबोडियाच्या यूथ फेडरेशन संघाने २०१५ नागरिकांना सहभागी करून मेडिसन नृत्य सादर करत विक्रम नोंदवला होता. हा विक्रम आजवर अबाधित होता. मात्र शनिवारी कंबोडियाच्याच यूथ फेडरेशनने ४९९९ नागरिकांना सहभागी करून घेत पुन्हा मेडिसन नृत्याचा आविष्कार केला आणि स्वतःचा विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला असल्याची माहिती गिनिस वर्ल्ड रेकार्डच्या प्रतिनिधी टोमोमी सेकिओका यांनी दिली आहे.
मेडिसन ही आमची परंपरा
स्वतःचा विक्रम मोडत नवा प्रस्थापित करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यूथ फेडरेशनचे प्रमुख हुन मेनी यांनी व्यक्त केली आहे. मेडिसन ही कंबोडियाची परंपरा आहे. लग्न समारंभात, आनंदाच्या सोहळ्यात आम्ही हे नृत्य करत असतो. देशातील ऐक्यभावना वाढीस लावणारा हा नृत्याविष्कार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वृत्तसंस्था