कॅटालिन नोवाक यांचा हंगेरीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
#बुडापेस्ट
हंगेरीच्या अध्यक्षा कॅटालिन नोवाक यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. बाल लैंगिक गुन्ह्यातील एका दोषीच्या माफीला मंजुरी दिल्याप्रकरणात त्यांनी राजीनामा द्यावा लागला आहे.अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर माजी न्याय मंत्री जुडीत वर्गा यांनीदेखील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींच्या निर्णयाच्या पत्रावर स्वाक्षरी केल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बाल लैंगिक गुन्ह्यातील दोषीच्या शिक्षेला माफी दिल्यानंतर देशात मोठा तणाव निर्माण झाला होता. विरोधकांनी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर नोवाक यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्या शेवटच्या भाषणात म्हणाल्या की, मी पदाचा राजीनामा देत आहे. ज्यांना मी दुखावलं आणि ज्या पीडितांच्या सोबत मी उभी राहिले नाही त्यांची मी माफी मागते. मी याआधीही आणि यापुढेही मुलांच्या, त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असेन.
२०२२ च्या निवडणुकीत पहिल्या महिला अध्यक्ष बनण्याचा मान नोवाक यांना मिळाला होता. पंतप्रधान विक्टर ऑर्बन यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात. बालगृहाच्या माजी उप संचालकाला माफी देण्यात आल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. या व्यक्तीने त्याच्या मालकाचा बाल लैंगिक गुन्हा झाकण्याचा प्रयत्न केला होता. इंडिपेडेन्ट न्यूज साईट ४४४ ने मागील आठवड्यात अध्यक्षांचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर विरोधकांनी नोवाक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे देशात राजकीय वातावरण तापले होते. शुक्रवारी आंदोलक अध्यक्षांच्या निवावस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. याप्रकरणात अध्यक्षांच्या तीन सल्लागारांनी पदाचा राजीनामा दिला होता. अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर अन्य काही मंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे.