रशिया नव्हे आता इराकमधून तेलखरेदी
#मॉस्को
भारताने मागच्या वर्षी जेव्हा रशियाकडून तेल खरेदी करायला सुरुवात केली होती, तेव्हा तेलावर मोठ्या प्रमाणात सूट मिळत होती. बघता बघता रशिया भारताचा तेलाचा पुरवठा करणारा महत्त्वाचा देश बनला. मात्र आता रशियाने भारताला दिलेली सूट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भारताने रशियाकडे पाठ फिरवली असून पारंपरिक तेल निर्यातदार देशांशी चर्चा करायला सुरुवात केली.
भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यात रस राहिलेला नाही, कारण त्या तेलावर मिळणारी सूट रशियाकडून कमी करण्यात आली आहे. भारताने तेल आयात करण्यासाठी आपल्या पारंपरिक तेल निर्यात करणाऱ्या देशांशी चर्चा करायला सुरुवात केली. रशियन तेलामध्ये मिळणारी कमी सूट आणि पेमेंट करताना येणाऱ्या अडचणींमुळे भारत सरकारने आपल्या पारंपरिक निर्यातदारांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. सरकार आता इराकमधून तेलाची आयात वाढवण्यासाठी चर्चा करत आहे. पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाने तेलाच्या किमतीमध्ये वाढ केली आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये रशियन तेल ६० डॉलर प्रतिबॅरलपेक्षा जास्त किमतीने विकले जात आहे.
मागच्या आठवड्यात रशियन तेलावर मिळणारी सूट घटली आहे. जर रशियन सरकार प्राईस कॅपपेक्षा जास्त किमतीमध्ये तेल विकत असतील, तर भारताला रशियाकडून तेल विकत घेण्याची गरज उरली नाही. भारताने इराक सरकारसोबत चर्चा करताना, तेलाच्या रकमेबद्दल काही नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारताचे सरकारी रिफायनर्स इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) , भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) इराककडून जास्त प्रमाणात खरेदी करतील, ज्या बदल्यात तेलाचे पैसे भारत ६० दिवसांऐवजी ९० दिवसांत देणार आहे.