बोरिस जॉन्सन यांनी संसद सदस्यत्व सोडले
#लंडन
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणीत भर पडली आहे. शुक्रवारी (९ जून) ‘पार्टीगेट’ प्रकरणाचा चौकशी अहवाल मांडला जाणार असल्याची कुणकुण लागल्याने त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता आहे.
मागच्या वर्षी पंतप्रधानपद सोडावे लागलेल्या जॉन्सन यांना संसद सदस्यत्वही सोडावे लागले आहे. त्यांनी राजीनामा दिला नसता तर संसदेची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांची हकालपट्टी झाली असती. ‘पार्टीगेट’ प्रकरणामुळे जॉन्सन यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. दरम्यान या सर्वांमागे विरोधकांचा हात असल्याचे जॉन्सन म्हणाले आहेत.
करोनाकाळात ब्रिटनमध्ये टाळेबंदी आणि संचारबंदी सुरू होती. तेव्हा निर्बंधांच्या काळातही 'डाउनिंग स्ट्रीट' या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी जॉन्सन यांनी स्नेहभोजन आयोजित केले होते. ‘पार्टीगेट’ नावाने हे प्रकरण जगभर गाजले. तसेच, संसदेची दिशाभूल केल्याचा आरोपही जॉन्सन यांच्यावर करण्यात आला होता. याच प्रकरणात जॉन्सन यांना १० दिवसांपेक्षा अधिक काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी संसदेची विशेषाधिकारी समिती करण्याची शक्यता होती. त्यापूर्वीच जॉन्सन यांनी राजीनामा दिला आहे. संचारबंदी असताना जॉन्सन यांनी नियमांचे उल्लंघन करत विविध ठिकाणी सभा घेतल्या. लोकांशी संवाद साधत संचारबंदीचे उल्लंघन केले. याबाबत संसदेत खरी माहिती दिली नाही.
विशेषाधिकार समितीचे पत्र मला मिळाले आहे. त्यातून स्पष्ट होते की, संसदेतून माझी हकालपट्टी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी पुरावे पाहण्याआधीच माझ्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यांनी कारवाई करण्यापूर्वीच पद सोडण्यात शहाणपणा असल्यानेच मी राजीनामा देत असल्याचे बोरिस जॉन्सन म्हणाले आहेत.