बायडन देणार भारतीयांना दिलासा
#वाॅशिंग्टन
भारतीय नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी जास्त काळ प्रतीक्षा करावी लागते. ही समस्या दूर करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी प्राधान्याने लक्ष घालावे, असा आग्रह सिनेटर बॉब मेनेंडेझ आणि मायकेल वॉल्ट्झ यांनी केला आहे.
अमेरिकेच्या व्हिसासाठी पहिल्यांदा मुलाखतीची वेळ मिळण्यास भारतीय नागरिकांना सध्या सरासरी ४५० ते ६०० दिवस प्रतीक्षा करावी लागते. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार असून लोकांच्या एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्काने त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाते, याकडे मेनेंडेझ आणि वॉल्ट्झ यांनी बायडन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
मेनेंडेझ हे सिनेटच्या परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष आहेत, तर वॉल्ट्झ हे अमेरिकेचे कायदेमंडळ असलेल्या काँग्रेसच्या भारतविषयक धोरणांकडे लक्ष देणाऱ्या 'इंडिया कॉकस'चे सह-अध्यक्ष आहेत. या दोघांनी काँग्रेसच्या दोन स्वतंत्र चर्चेदरम्यान भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी ६०० दिवसांपर्यंत प्रतीक्षा का करावी लागते, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ही समस्या सोडवण्यासाठी परराष्ट्र विभाग परिश्रम घेत असून त्यासाठी अनेक उपाय करण्यात आल्याचे परराष्ट्र राज्यमंत्री रेना बिटर यांनी मेनेंडेझ आणि वॉल्ट्झ यांना सांगितले. आम्ही या वर्षी १० लाख भारतीयांना व्हिसा देणार असल्याची ग्वाही रेना यांनी दिली आहे.