बायडेन यांना हवा अजून एक चान्स
#नैरोबी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाची आणखी एक टर्म मिळावी यासाठी उत्सुक आहेत. वयोमर्यादेचा विचार करता ८० वर्षीय बायडेन यांनी यापूर्वी तशी ईच्छा अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केली होती. मात्र ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी ज्यो आणखी एक टर्म देशाचे नेतृत्व करू शकतात, असे सांगत त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. जिल बायडेन सध्या आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर असून वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मात करून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकणाऱ्या बायडेन यांना त्यांच्या कारकिर्दीत फारसा प्रभाव दाखवता आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षातही पुन्हा बायडेन यांना उमेदवारी देण्याबाबत अनुकूल वातावरण नसल्याचे बोलले जात आहे. त्यात विरोधी बाकावरील रिपब्लिकन पक्षाकडून यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्याऐवजी ताज्या दमाचे उमेदवार मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्ष यावेळी ताज्या दमाचे उमेदवार मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर जिल बायडेन यांनी हे विधान केले आहे. बायडेन यांना आणखी एक टर्मसाठी उमेदवारी देताना त्यांच्या वयाचा विचार केला जाऊ शकतो. कारण बायडेन सध्या ८० वर्षांचे आहेत, त्यामुळे या वयात ते ही जबाबदारी पार पाडू शकतील का, या प्रश्नाला जिल बायडन यांनी, वयाचा आणि कार्यक्षमतेचा संबंध नसल्याचे उत्तर दिले आहे.
बायडेन यांना वाटते की, त्यांना अजून देशाची सेवा करण्याची संधी मिळालेली नाही. दुसरी टर्म मिळाल्यास ज्यो नक्कीच अमेरिकेसाठी काहीतरी योगदान देऊ शकतील, असा विश्वास जिल बायडेन यांनी व्यक्त केला आहे.
वृत्तसंंस्था