अमेरिकेच्या संसदेत घुमले भगवद्गीतेचे स्वर
#वॉशिंग्टन
अमेरिकेची पहिली हिंदू-अमेरिकन परिषद सत्तेचे सर्वोच्च केंद्र असलेल्या कॅपिटल हिल येथे पार पडली. १४ जून रोजी ही परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेचा उद्देश अमेरिकेत राहणाऱ्या हिंदू समुदायाच्या समस्यांकडे अमेरिकन कायदा निर्मात्यांचे लक्ष वेधून घेणे हा होता. या परिषदेला 'अमेरिकन फॉर हिंदू' असे नाव देण्यात आले होते. तर या परिषदेची सुरुवात वैदिक मंत्रोच्चार आणि प्रार्थनेने झाली.
अमेरिकेच्या माहिती-तंत्रज्ञान, वैज्ञानिक संशोधन, व्यवसाय, उद्योफ आणि सेवा क्षेत्रात आघाडीवर असणारे हिंदू राजकीय क्षेत्रात मात्र म्हणावे त्या प्रमाणात एकवटलेले नाहीत. विविध क्षेत्रात मोठे योगदान देणारे अमेरीकन-हिंदू, त्यांच्या समस्या सरकारदरबारी पोहचायला हव्यात, यासाठी अमेरिकेतील २० हिंदू संघटनांनी या परिषदेचे आयोजन केले. अशा प्रकारे सगळे अमेरिकन हिंदू एकत्र आणण्यासाठी अशी परिषद घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. राजकीय सहभागासाठी अमेरिकन-हिंदू संमेलन आयोजित केले असल्याचे आयोजकांनी आधीच स्पष्ट केले आहे. अमेरिकन संसदेचे अध्यक्ष केविन मैक्कार्थी आणि डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन पक्षांचे अनेक नेतेही या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेत फ्लोरिडा, न्यूयॉर्क, बोस्टन, टेक्सास, शिकागो, कॅलिफोर्निया आदी शहरांतील सुमारे १५० भारतीय अमेरिकन नेते सहभागी झाले.
राजकीय आघाडीवर हिंदू पिछाडीवर
अमेरिकेच्या राज्यघटनेशी पूर्णपणे जुळतात, भगवद्गीतेतील मानवतावादी तत्वज्ञानाशी जुळतात. म्हणूनच आम्ही हिंदू अमेरिकेतही स्थानिक संस्कृती, परंपरांशी एकरूप होऊन सुखाने जगत असल्याचे हिंदू-अमेरिकन परिषदेचे संस्थापक- अध्यक्ष रोमेश जापरा म्हणाले. आपला समाज सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक अशा अनेक क्षेत्रात सक्रिय आहे, पण राजकारणात आपण खूप मागे आहोत. आपल्या समाजात अनेक चांगले शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि विचारवंत लोक आहेत. पण राजकारणात आपल्याला तितके यश मिळालेले नाही. त्यामुळे प्रथमच अमेरिकेतील सगळ्या हिंदूंना एका व्यासपीठावर निमंत्रित केले आहे. इथले हिंदू एकवटले तर आगामी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष कोण असावा, हे ठरवण्यातही आपण निर्णायक भूमिका पार पाडू शकतो. या परिषदेच्या माध्यमातून सर्व हिंदूंच्या समस्या, त्यांच्या अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही जापरा यांनी नमूद केले आहे.
हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी संघटना
अमेरिकेच्या विविध प्रांतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी एक कायमस्वरूपी संघटना स्थापन करण्याची गरज या परिषदेत खासदार श्री ठाणेदार यांनी व्यक्त केली आहे. या संघटनेत सर्व समाविचारी खासदारांचा समावेश असेल. इतर अमेरिकन नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधी या हिंदू अमेरिकन नागरिकांच्या समस्या, त्यांच्या मागण्या सोडवू शकतील, यासाठी ही संघटना पुढाकार घेणार असल्याचे ठाणेदार म्हणाले आहेत.