जागतिक बँक अध्यक्षपदासाठी बंगांची शिफारस
#वॉशिंग्टन
प्रतिष्ठेच्या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचे व्यवस्थापन तज्ज्ञ अजयपाल सिंग बंगा यांची शिफारस करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीच ही घोषणा केली असून ती भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब म्हणावी लागेल. ही घोषणा करताना बायडेन यांनी बंगा यांनी आर्थिक सर्वसमावेशकता आणि पर्यावरण बदल क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.
जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत नव्या अध्यक्षांची निवड करावी लागणार आहे. जागतिक बँकेत अमेरिकेचा हिस्सा सर्वाधिक असल्याने त्यांनी शिफारस केलेल्या नावाची सर्वसाधारणपणे निवड होते. त्यामुळे बंगा हे जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष असणार हे जवळपास नक्की झाले आहे. जागतिक बँकेच्या संचालक मंडळाने त्यावर शिक्कामोर्तब करणे ही केवळ आता औपचारिकता राहिली आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या जागतिक पातळीवरील दोन महत्त्वाच्या संस्था असून त्यातील एकीच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसण्याची ही पहिलीच वेळ बंगा यांच्या रूपाने भारताला प्राप्त होईल. जागतिक बँकेवर अमेरिकी व्यक्ती तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर युरोपीय व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडला जाण्याचा प्रघात आहे. वृत्तसंंस्था