पुन्हा वाटचाल शीतयुद्धाच्या दिशेने...
#वाॅशिंग्टन
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन जगातील अनेक देशांनी शीतयुद्ध आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ अनुभवले. सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतर चीनच्या रूपात अमेरिकेला प्रतिस्पर्धी निर्माण झाला. आता अमेरिका आणि चीन यांच्यात एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती आणि कृती पुन्हा शीतयुद्धाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दर्शवते. अमेरिकेवर नजर ठेवण्यासाठी चीन आता क्यूबात गुप्तचर तळ उभारणार असल्याचे वृत्त असल्याने वातावरण तापले आहे.
अमेरिकेतील माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेवर लक्ष ठेवण्यासाठी चीन अमेरिकेचाच शेजारी असलेला लॅटिन अमेरिकन देश क्यूबामध्ये गुप्तचर तळ उभारणार आहे. अमेरिकन वृत्तपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. गुप्तचर केंद्र बांधण्याच्या बदल्यात चीनने क्यूबाला अनेक अब्ज डॉलर्स देऊ केले आहेत, असाही दावा या अहवालात करण्यात आला.
हे स्टेशन अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यापासून अवघ्या १६० किलोमीटर अंतरावर असेल. क्यूबाने मात्र हा अहवाल स्पष्टपणे फेटाळून लावला. क्यूबाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, आमच्यावर आर्थिक निर्बंध लादण्याचा अमेरिकेचा नवा डाव आहे. क्यूबाविरुद्ध कारवाई करण्यासाठी अमेरिकेला काहीतरी निमित्त हवे आहे. त्यासाठी आमच्यावर असे आरोप करण्यात येत आहेत.’’
वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, क्यूबामध्ये चीनच्या गुप्तचर केंद्रातून अमेरिकेच्या दक्षिण पूर्व प्रदेशाची माहिती मिळू शकते. अमेरिकेचे येथे अनेक लष्करी तळ आहेत. चीनला गुप्तचर केंद्राच्या माध्यमातून अमेरिकेच्या जहाजांच्या वाहतुकीचाही मागोवा घेता येणार आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे मुख्यालयही फ्लोरिडा येथील टँपा येथे आहे. त्याच वेळी, अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ उत्तर कॅरोलिनामध्ये आहे, जो क्यूबापासून ९८६ मैलांवर आहे.
अमेरिकेचा सावध पवित्रा
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राने आपल्या अहवालात केलेला क्यूबात चिनी गुप्तहेर केंद्र उभारण्याचा दावा व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी फेटाळून लावला आहे. हा अहवाल चुकीचा असल्याचे सांगतानाच आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेबाबत वचनबद्ध आहोत, असा सावध पवित्रा अमेरिकेने घेतला. जॉन किर्बी यांनी अमेरिकेने क्यूबामध्ये गुप्तचर केंद्र बांधल्याच्या वृत्ताचे खंडन केले.
मात्र ते म्हणाले ‘‘आमचे प्रशासन सर्व कामांवर लक्ष ठेवून आहे. आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत.’’
‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या वृत्तानुसार, तैवान आणि गुप्तचर फुग्यांवरून चीन आणि अमेरिकेतील वाद सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत क्यूबातील गुप्तचर केंद्रामुळे दोघांमधील संबंध आणखी बिघडतील. रशिया आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धासारखी परिस्थिती होऊ शकते.