सोशल मीडियाला आवरा अन्यथा माजेल हाहाकार
#लोवा
सोशल मीडियाचा वापर ही जगभरातील लोकांची गरज बनली आहे. या कंपन्यांनी सर्वसामान्यांना त्यांचे व्यसन लावले आहे. मात्र सोशल मीडियाच्या वापरासाठीच्या नियमावलीकडे हेतुतः दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडिया अपप्रचाराचे हत्यार बनले असून याला वेळीच आवर घातला नाही तर लाखो लोकांचा बळी जाण्याची भीती 'मेटा' या कंपनीच्या माजी कर्मचारी फ्रान्सेस हॉगन यांनी व्यक्त केली आहे.
हॉगन यांनी सोशल मीडियाबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. सोशल मीडिया जर सुधारले नाही, तर येत्या काळात लाखो लोकांचा बळी जाऊ शकतो, असे यांचे म्हणणे आहे. फ्रान्सेस यांनी आपल्या अहवालात बरीच गोपनीय माहिती दिली आहे. किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर इन्स्टाग्रामचा काय परिणाम होतो याकडे ‘मेटा’ साफ दुर्लक्ष करते. तसेच, भारतात धार्मिक तेढ वाढवण्यासाठी फेसबुकची भरपूर मदत झाल्याचे हॉगन यांच्या अहवालात म्हटले आहे. पारदर्शकतेच्या अभावामुळे सोशल मीडिया हे अजूनही धोकादायक आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामबद्दल बाहेर येणारी माहिती आणि सत्य माहिती यामध्ये भरपूर फरक आहे, यामुळेच मेटाचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. २०१८ साली संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या एका तपासात असे दिसून आले आहे की, म्यानमारमध्ये झालेल्या नरसंहारात फेसबुकचे भरपूर योगदान राहिले आहे. एका ब्रिटिश मुलाच्या आत्महत्येसाठी इन्स्टाग्रामला जबाबदार धरण्यात आल्यानंतर कंपनीने अनेक धोरणात्मक बदल केले होते. मात्र हे बदल पुरेसे नसल्याचे स्पष्ट करताना हॉगन की, सोशल मीडियाचा हा धोका कमी करण्यासाठी आपल्याला हा मीडिया समजून घ्यावा लागेल. सोशल मीडियामध्ये सुधारणा होणे अवघड आहे, मात्र त्याची आपल्याला गरज आहे. असे न झाल्यास पुढील २० वर्षांमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.