ॲमेझॉनमध्ये पुन्हा कर्मचारी कपात
#न्यूयॉर्क
ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या ॲमेझॉनने या वर्षी सलग दुसऱ्यांदा कर्मचारी कपातीची घोषणा केली असून पुढील काही आठवड्यात आणखी नऊ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षातील एकूण कर्मचारी कपातीची संख्या २७ हजारांवर पोहोचली आहे.
ॲमेझॉनच्या कर्मचारीकपातीच्या निर्णयामुळे युनायटेड स्टेट्समधील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. मेटा, ॲमेझॉन आणि गुगलसारख्या मातब्बर कंपन्यांनी मागच्या दशकात अतिशय वेगाने प्रगती साधली होती. पण आता या कंपन्या डळमळायला लागल्या आहेत. तंत्रज्ञान कंपन्या ज्या बँकेशी व्यवहार करायच्या ती सिलिकॉन व्हॅली बँकदेखील काही दिवसांपूर्वी पत सांभाळू न शकल्यामुळे कोसळली.
ॲमेझॉनच्या सीईओ अँडी जेसी यांनी कर्मचाऱ्यांना एक मेमो पाठवून, कंपनी दुसऱ्या टप्प्यातील वार्षिक नियोजन करत असल्याचे सांगितले. ही प्रक्रिया या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. यामुळे आणखी काही नोकरकपात करावी लागणार आहे. तसेच काही मोक्याच्या विभागांत पुन्हा नवी नोकरभरतीदेखील केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी जानेवारी महिन्यातच ॲमेझॉनने जगभरातील १८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. तंत्रज्ञान क्षेत्रातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी नोकरकपात ठरली. आता नवीन नोकरकपातीचा परिणाम कंपनीच्या नफ्यावरदेखील होऊ शकतो. क्लाऊड कम्पुटिंग विभाग आणि जाहिरात व्यवसायाशी निगडित विभागातील कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार आहे.
काय दिले कपातीचे कारण ?
अनिश्चित आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत आहे. ही अनिश्चितता येणाऱ्या काही वेळेत नक्कीच दूर होईल. त्यामुळे खर्च आणि पगार यांचा ताळमेळ साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जेसी म्हणाल्या आहेत. काही लोक विचारतात की, महिन्यापूर्वी जेव्हा पहिली नोकरकपात केली होती, तेव्हा ही भूमिका का जाहीर केली नाही? याचे उत्तर असे की, आमच्या सर्व विभागांनी त्यांच्या टीमचे विश्लेषण केले नव्हते. योग्य खबरदारी घेऊन मूल्यांकन न करता हा निर्णय घेणे योग्य नव्हते. आता हा निर्णय आम्ही सर्वांना कळविण्याचे ठरविले असून पुढील माहिती लवकरात लवकर कळविली जाईल,” असेही जेसी यांनी मेमोत म्हटले आहे.