लंडनमध्ये आणखी एका भारतीयाची चाकूने भोसकून हत्या
#लंडन
ब्रिटनमध्ये गेल्या तीन दिवसांत दोन भारतीय नागरिकांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी (१६ जून) झालेल्या ताज्या हल्ल्यात अरविंद शशिकुमार (३८) या भारतीय वंशाच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली, तर या घटनेच्या अवघ्या तीन दिवस आधी लंडनमध्ये शिकणाऱ्या हैदराबाद येथील २७ वर्षीय विद्यार्थिनीची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली होती. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद शशिकुमार असे मृताचे नाव आहे. जो मूळचा केरळचा होता. शुक्रवारी त्याचा रूममेट सलमान सलीमने त्याच्या छातीवर वार करून त्याची हत्या केली. विद्यार्थी व्हिसावर आल्यानंतर शशिकुमार गेल्या १० वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय सलमान सलीमला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे दोघे साउथेम्प्टन वे, कॅम्बरवेल येथे एका घरात एकत्र राहात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला, त्यानंतर प्रकरण चिघळले आणि भांडण झाले. त्यानंतर आरोपीने अरविंद शशिकुमार याची चाकूने वार करून हत्या केली. ही घटना १६ जून रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तर शुक्रवारी रात्री १.३१ वाजता अरविंद शशिकुमार यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानुसार शशिकुमारचा मृत्यू छातीत वार झाल्यामुळे झाला. पोलिसांनी सांगितले की, मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून, गुन्हे शाखेच्या तज्ञांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये एम एस्सी करणाऱ्या हैदराबादच्या तेजस्विनी कोनथमची (वय २७) राहत्या घरी वार करून हत्या करण्यात आली होती.