आंध्र प्रदेशातील महिलेची ऑस्ट्रेलियामध्ये निर्घृण हत्या; पोलिसांचा पतीवर संशय
#मेलबर्न
भारतातील हैदराबादच्या महिलेची ऑस्ट्रेलियामध्ये हत्या करण्यात आली असून या महिलेचा मृतदेह कचराकुंडीत सापडला आहे. ही हत्या तिच्या पतीने केल्याचा संशय असून महिला गेल्या काही दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याचे कळते. या महिलेचे नाव चैतन्या मधागनी असून चैतन्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जावयाने ही हत्या केली असून त्याची कबुलीही त्याने दिली आहे.
स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार या भारतीय महिलेचे नाव चैतन्या मधागनी असून ती आपल्या कुटुंबासोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहात होती. ती मूळ हैदराबाद येथील आहे. या महिलेचा मृतदेह शनिवारी एका रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचराकुंडीत आढळला. चैतन्या मधागनी हिचा पती अशोक राज हा आपल्या ५ वर्षांच्या मुलासह ५ मार्चला भारतात आलेला आहे. तेव्हापासूनच चैतन्या मधागनी बेपत्ता होती. ती गेल्या काही दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात आली नसल्याचे कळते. चैतन्याचा पती अशोक राज याने ऑस्ट्रेलियातील शेजाऱ्यांकडे तसेच जवळच्या व्यक्तींकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अशोकने पोलिसांशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच पोलिसांना चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. या हत्येबाबत पोलिसांना काही पुरावेही सापडले आहेत. पोलिसांच्या शक्यतेनुसार, आरोपी ऑस्ट्रेलियातून पळून गेला आहे. पोलिसांनी चैतन्याच्या जवळच्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे.
याबाबत उप्पलचे आमदार बंडारी लक्ष्मा रेड्डी यांनी सांगितले की, ही महिला माझ्या मतदारसंघातील होती. त्यांनी चैतन्याच्या महिलेच्या कुटुंबाचीही भेट घेतली आहे. रेड्डी म्हणाले की, महिलेच्या पालकांच्या विनंतीवरून त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला चैतन्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी पत्रही लिहिले आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनाही कळवले असल्याचे त्यांनी सांगितले. मृत चैतन्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जावयाने ही हत्या केली असून त्याची कबुलीही त्याने दिली आहे.