अन् या वृद्धाचा एकाकीपणा संपला
#बेनिडॉर्म
ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा जगभरात साधारणतः सारख्याच असतात. म्हातारपण अटळ असते. त्यात जोडीदाराने निरोप घेतला की, एकट्याने मरेपर्यंत जगणे कठीण होऊन जाते. अशीच काहीशी अवस्था बेनिडॉर्म शहरातील डेरेक फ्लिन यांची झाली होती. मात्र सध्या ते स्पेनमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती बनले आहेत.
डेरेक फ्लिन हे स्पेनमधील एक साधे सरळ नागरिक आहेत. बेनिडाॅर्म शहरात आयुष्यभर बुटांचे जोड विकणाऱ्या डेरेक फ्लिन यांची पत्नी नुकतीच वारली. वयाची सत्तरी ओलांडलेल्या डेरेक यांना जगणे नकोसे झाले. एकाकीपणा सतावू लागला. म्हणून त्यांनी अचानकपणे घर सोडले. जवळच्या काही मित्रांना सांगितले की, ते स्पेनमधील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामाला जाणार आहेत. मात्र त्यांच्या जवळच्या मित्राला, निगेल हॉबडे यांना हे ठावूक नव्हते. त्यामुळे निगेल हॉबडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. त्यात, जोडीदार वारल्यामुळे दु:खी झालेला आपला मित्र घराबाहेर गेला आहे. त्याचा काहीच पत्ता लागत नाही. स्वभावाने तो प्रेमळ असून तो जिथे कुठे असेल, तिथे त्याच्यासोबत सेल्फी घ्या आणि त्याचा पत्ता कळवा, अशी ती पोस्ट होती.
ही पोस्ट व्हायरल झाली आणि डेरेक एका रात्रीत स्पेनमधील लोकप्रिय व्यक्ती बनले आहेत. ही पोस्ट पाहून प्रत्येकजण त्यांच्याकडे जात आहे आणि सेल्फी काढून पोस्ट करत आहे. अचानक आपल्या आयुष्यात होत असलेल्या घडामोडीमुळे डेरेक आनंदी झाले आहेत. आजवर २ हजारांहून अधिक लोकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढली आहे. आता ते मस्त आनंदाने जगत आहेत. त्यांचा एकाकीपणा संपला आहे. पत्नी सोडून गेल्याचे दुःख मी विसरून गेलो आहे. त्यामुळे आता मी आनंदात आहे, लोक येतात माझ्यासोबत सेल्फी काढतात, माझा वेळ मजेत जात असल्याचे डेरेक सांगतात.