मृत्यूचा पर्यावरणपूरक मार्ग
#न्यूयॉर्क
एखादी व्यक्ती मेली की त्याच्यावर त्याच्या धर्मानुसार शेवटचे संस्कार केले जातात. कोणी प्रेत जाळते, कोणी पुरते. मात्र अमेरिकेत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा पारंपरिक प्रकार सोडून त्या मृतदेहाचे निसर्गतः विघटन करण्याची पद्धत सुरु करण्यात आली आहे. मृतदेहावर ख्रिश्चन धर्मानुसार अंत्यसंस्कार न करता पर्यावरणाचा विचार करत त्याचे कंपोस्ट करणारा न्यूयॉर्क हा आता अमेरिकेतील सहावा प्रांत बनला आहे.
२०१९ साली वॉशिंग्टनमध्ये सर्वात पहिल्यांदा मृतदेह सामूहिक ठिकाणी शवपेटिकेत ठेवण्यापेक्षा त्याचे नैसर्गिक विघटन होऊ देण्यात आले.वॉशिंग्टननंतर कोलोरॅडो, ओरेगॉन, वेरमोंट, कॅलिफोर्निया या प्रांतांनीही या पर्यावरणपूरक मार्गाला कायदेशीर मान्यता दिली. या प्रांतातही एखादी व्यक्ती मेली की त्याच्या शरीराचे नैसर्गिक पद्धतीने विघटन होऊ देण्याची पद्धत प्रचलित झाली आहे.
या पद्धतीला नैसर्गिक अथवा सेंद्रिय विघटनाची पद्धती संबोधण्यात येते. सनातनी अथवा धार्मिक लोकांनी या कल्पनेस विरोध दर्शवला असला तरी पर्यावरणाची महती समजलेल्या तरुण पिढीने ही कल्पना उचलून धरली. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलासारख्या मानवी समूहासमोरील संकटाच्या पार्श्वभूमीवर मानवी मृतदेह पुरणे अथवा जाळण्याच्या प्रक्रियेमुळे कारबन उत्सर्जनाचे प्रमाण वाढते आहे.
एक मृतदेह जाळल्यास हवेत १९० किलो कार्बन वातावरणात सोडले जाते. मृतदेह पुरल्यास तेवढी जागा वापरली जाते आणि मानवी शरीरातील घातक विष मातीत मिसळले जाते, जे जमिनीसाठी धोकादायक ठरू शकते. याशिवाय अमेरिकेत मृतदेह जाळणे अथवा पुरण्यासाठी खर्चही खूप येतो. साधरणतः अमेरिकेत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ७ ते १० हजार डॉलर खर्च येतो. यातुलनेत मानवी मृतदेहाच्या नैसर्गिक विघटनाला केवळ ५५० डॉलरचा खर्च येतो. मृतदेह जाळण्या अथवा पुरण्यापेक्षा कमी ऊर्जा, कमी खर्चात हा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.वृत्तसंस्था