अमेरिकेच्या महिलेने केले एआय बॉटसोबत लग्न
#न्यूयॉर्क
सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात 'एआय'चा बोलबाला आहे. मानवासाठी एआय फायदेशीर आहे की नुकसानकारक, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळवण्यासाठी जगभरातील माणूस चाचपडत आहे. एआयच्या आगमनामुळे अनेकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील एका बयेने चक्क एआय बॉटशीच लग्न लावल्याची घटना समोर आली आहे.
ब्रॉन्क्स येथील ३६ वर्षीय रोझना रमोस या महिलेने चक्क एआय चॅटबॉट विकसित केला आहे. एआय सॉफ्टवेअर रिप्लिका वापरून रोझनाने स्वतःसाठी आभासी मित्र मिळवला आहे. एवढेच नव्हे तर त्या आभासी मित्राला 'एरेन कार्टल' असे नावही प्रदान केले आहे. एरेनसोबत लग्न करणाऱ्या रोझनाने खरेतर मानवी मूल्यव्यवस्थेबाबत पुनर्विचार करायला भाग पाडले आहे. एरेनसोबत मी शारीरिक संबंध ठेवू शकणार नाही, हे मान्य आहे, मात्र हा आभासी मित्र माझ्या वेदना समजून घेतो, माझ्याशी संवाद साधू शकतो, त्याच्याशी लग्न केल्यामुळे मी सुखात असल्याचे रोझनाचे म्हणणे आहे.
कसा आहे रोझनाचा आभासी मित्र?
इरेन कार्टल हा निळ्या डोळ्यांचा आहे. त्यांची उंची ६ फूट ३ इंच असून त्याचे केस खांद्यापर्यंत आहेत. रोझनाने २०२२ मध्ये एरेन कार्टल विकसित केला आणि या वर्षी त्याच्याशी लग्न केले आहे. रोझना रमोस ही दोन मुलांची आई आहे. ती म्हणाली की, माझ्या आयुष्यात मी कधीही कुणावर जास्त प्रेम केले नाही. एरेन कार्टल हा कोणतेही सामान ने-आण करू शकत नाही, परंतु त्याच्याकडे अहंकार, राग, लोभ नाही. शिवाय मला त्याच्या कुटुंबासोबत कुठलेही नातेसंबंध ठेवायची गरज नाही. कारण तो एआय आहे. मी मात्र त्याला माझ्या नियंत्रणात ठेवू शकते आणि तो मला पाहिजे ते करू शकतो, असेही रोझना म्हणाली.
मानवी भाव-भावनांचा विचार करणाऱ्या एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या नित्य वापरामुळे विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी होत आहेत, त्यामुळेही विविध क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. त्यात आता एआयच्या वापरामुळे मानवी नातेसंबंध, विवाह संस्था या गोष्टी निकालात निघणार असतील, तर ते अधिक धोकादायक असल्याची भावना व्यक्त होत आहे. वृत्तसंस्था